विसर्जन मिरवणुकीदरम्यान १७ रस्ते राहणार बंद; खुलताबादच्या वाहतुकीतही बदल
By सुमित डोळे | Published: September 27, 2023 07:28 PM2023-09-27T19:28:46+5:302023-09-27T19:29:14+5:30
२२६ अधिकाऱ्यांसह ३ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, सकाळी ७ वाजेपासून वाहतूकीसाठी बंद राहणार
छत्रपती संभाजीनगर : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. गुरूवारी सकाळपासूनच विसर्जन सुरू होणार असून पोलिसांनी यासाठी २२६ अधिकाऱ्यांसह ३ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैणात केला आहे. शिवाय, देखावे, ढोल पथकांसह गणरायाची मिरवणूक निघणार असल्याने या मार्गांवरील वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. सकाळी ११ वाजेपासून शहरातले १७ प्रमुख मार्ग विसर्जन पुर्ण होईपर्यंत बंद राहतील, अशी माहिती पोलिस आयुक्त मनोज लोहिया, वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त धनंजय पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
समजून घ्या, कसे असतील आजचे वाहतूकीचे मार्ग -
राजाबाजारमधील शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपतीची सकाळी ११ वाजता मिरवणूकीस प्रारंभ होईल. तेथून पुढे बाराभाई ताजिया, बळवंत वाचनालय, एस.बी. कॉलेज मार्गे जिल्हा परिषद मैदानावर पोहोचेल. हा मार्गही वाहतूकीसाठी बंद राहिल. त्याशिवाय
-सिटीचौक ते जुनाबाजार मार्गे भडकलगेट
-जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफरगेट मोंढा ते राजाबाजार
-निजामोद्दीन दर्गा रोड ते निजामोद्दीन चौक व डावीकडे शहागंज चमन.
-भुरे पहेलवान यांचे घर ते निजामोद्दीन चौक व उजवीकडे शहागंज चमन
-चेलीपुरा चौक ते गांधी पुतळा, मंजुरपुरा चौक ते गांधीपुतळा.
-लोटाकारंजा ते सराफा रोड, रोहिला गल्ली ते सराफा रोड.
-कामाक्षी लॉज ते सिटीचौक व पुढे गुलमंडी, बाराभाई ताजिया, गोमटेश मार्केट मार्गे पैठणगेट या रस्त्यावरील सर्व पूर्व-पश्चिम गल्ल्या बंद राहतील.
-सिटीचौक पोलीस ठाण्याची पश्चिमेकडील बु-हाणी हायस्कूलकडे जाणारी गल्ली.
-बुढीलाईन, जूने तहसिल कार्यालय, जुना बाजार, बारुदगरनाला
-सिल्लेखाना चौक, पैठणगेट, बाराभाई ताजिया, रंगारगल्ली, सिटीचौक
-सावरकर चौक, एम.पी. लॉ कॉलेज, महात्मा फुले पुतळा चौक
-अंजली टॉकीज, महात्मा फुले चौक ते बाबुराव काळे चौक.
-रॉक्सी कॉर्नर, जिजामाता कॉलनी ते बाबुराव काळे चौक.
नविन छत्रपती संभाजीनगर सिडको हडको, गजानन महाराज मंदीर विसर्जन मिरवणुकीचे मार्ग देखील बंद राहतील. त्यात
-चिश्तीया चौक अविष्कार चौक बजरंग चौक ते बळीराम पाटील शाळा चौक, ओंकार चौक ते सिडको पोलीस ठाण्या समोर एन-७ बस स्टॉप पार्श्वनाथ चौक.
-एन ९ एम-२, एन ११, जिजाऊ चौक, टी.व्ही. सेंटर चौक ते एन-१२ स्वर्ग हॉटेल जवळील विहोर पर्यंत तसेच जिजाऊ चौक ते शरद टी.
-चांदणे चौक, जिल्हाधिकारी कार्यालय. टी. व्ही. सेंटरकडे जाणारा रस्ता.
-एन १ चौक ते चिश्तिया चौक, सेंट्रल जकात नाका तसेच चिस्तीया चौक ते व्दारकादास साडी सेंटर
-आझाद चौक ते बजरंग चौक, देवगिरी नागरी सहकारी बँक.
-सेव्हनहील ते शिवाजीनगर, त्रिमुर्ती चौक ते गजानन मंदीर, पटीयाला बँक ते गजानन मंदीर.
ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम बांधव गुरूवारी खुलताबादच्या जर-जर-जरी बक्ष इदगाह येथे उरुसा निमित्त भेट देतात. त्याच दरम्यान गणपती विसर्जन मिरवणूका देखील निघतील. त्यामुळे वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी सकाळी ८ ते रात्री १२ दरम्यान दौलताबाद टि पॉईंटवरुन खुलताबादकडे जाणारी व माळीवाडा गावातून दौलताबादकडे जाणारी सर्व प्रकारची वाहनांसाठी हा मार्ग बंद राहिल.
या दरम्यान वाहने
-छत्रपती संभाजीनगर कडून कन्नड-धुळे कडे खुलाताबाद मार्गे जाणारे सर्व प्रकारची मध्यम व जड वाहने हे दौलताबाद टी पॉईंट, माळीवाडा, जांभाळा, कसाबखेडा फाटा, वेरूळ या मार्गाने जातील
- धुळे - कन्नडकडून खुलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे येणारी मध्यम व अवजड वाहने ही वेरूळ, कसाबखेडा फाटा, जांभाळा, माळीवाडा, दौलताबाद टी पॉईंट, नगरनाका, बाबा पेट्रोलपंप या मार्गाने येतील.
-माळीवाडा ते दौलताबाद मार्गे खुलताबादकडे जाणारी सर्व प्रकारची मध्यम व जड वाहने हि माळीवाडा, जांभाळा, कसाबखेडा फाटा, वेरुळ या मार्गाने जातील व येतील.