पीएम केअर फंडातील १७ व्हेंटिलेटर दुरुस्ती, अपग्रेडनंतरही वापरता येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:05 AM2021-05-25T04:05:21+5:302021-05-25T04:05:21+5:30
घाटीतील स्थिती : पुन्हा नवीन अहवाल तयार करण्याचे काम सुरू औरंगाबाद : दुरुस्ती आणि अपग्रेड केल्यानंतरही पीएम केअर ...
घाटीतील स्थिती : पुन्हा नवीन अहवाल तयार करण्याचे काम सुरू
औरंगाबाद : दुरुस्ती आणि अपग्रेड केल्यानंतरही पीएम केअर फंडातील १७ व्हेंटिलेटर घाटी रुग्णालयातील रुग्णांसाठी वापरता आले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटरची स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. या परिस्थितीसंदर्भातही घाटी रुग्णालयाकडून नवीन अहवाल तयार करण्यात येत आहे.
पीएम केअर फंडातून घाटीला १५० व्हेंटिलेटर प्राप्त झाले. परंतु हे व्हेंटिलेटर आयसीयूत वापरण्यासारखे नसल्याचे घाटीच्या तज्ज्ञांनी पहिल्याच दिवशी स्पष्ट केले आहे. त्यानंतरही हे व्हेंटिलेटर घाटीत वापरण्याचा अट्टहास सुरुच ठेवला आहे. ‘लोकमत’ने वेळोवेळी सविस्तर वृत्त प्रकाशित करून या व्हेंटिलेटरची अवस्था समोर आणली आहे. काही व्हेंटिलेटर अन्य जिल्ह्यांना, तर काही खासगी रुग्णालयांना देण्यात आली आहेत. तर काही घाटीत पडून आहेत. घाटीत संबंधित कंपनीच्या इंजिनिअर्सनी गेल्या काही दिवसांत १७ व्हेंटिलेटर्स दुरुस्त आणि अपग्रेड करण्याचे काम केले. त्यानंतर हे व्हेंटिलेटर रुग्णांसाठी पाठविण्यात आले. परंतु हे व्हेंटिलेटर अवघ्या काही तासांत परत काढून घ्यावे लागले. एकही व्हेंटिलेटर आतापर्यंत रुग्णांसाठी वापरता आले नसल्याचे घाटीतील सूत्रांनी सांगितले.
घाटीतील तज्ज्ञांनी व्हेंटिलेटरच्या अवस्थेविषयी यापूर्वी अहवाल दिला होता. आता दुरुस्ती, अपग्रेडनंतरही व्हेंटिलेटरची काय अवस्था पहायला मिळाली, यासंदर्भात पुन्हा एकदा अहवाल तयार करण्यात येत असल्याचे समजते. एकीकडे ही स्थिती आहे. तर दुसरीकडे व्हेटिलेटर्स नादुरुस्त असल्याचे आणि आयसीयूत वापरण्यायोग्य नसल्याचे समोर येऊन दोन आठवडे उलटूनही त्यासंदर्भात कोणतीही चौकशी होत नसल्याची स्थिती आहे. हे व्हेंटिलेटर केवळ दुरुस्त करण्याचा खटाटोप सुरूच आहे.
खासगीतील व्हेंटिलेटर दुरुस्त
घाटीपाठोपाठ खासगी रुग्णालयांना दिलेले व्हेंटिलेटर्स दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका खासगी रुग्णालयाला ३ व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. व्हेंटिलेटर घेतल्यापासून ते विनावापर पडून होते. हे व्हेंटिलेटर तपासण्यासाठी रविवारी या रुग्णालयात इंजिनिअर्स पोहोचले. सायंकाळी उशिरा व्हेंटिलेटर दुरुस्त झाले. परंतु आता हे व्हेंटिलेटर रुग्णांसाठी वापरता येणार का, त्यासंदर्भात रुग्णालयात चाचणी घेतली जात आहे.