कंत्राटदारावर १८ कोटींची मेहरबानी; पैठण मार्गावरील सात किलोमीटर कामाला फाटा

By विकास राऊत | Published: October 15, 2024 04:50 PM2024-10-15T16:50:18+5:302024-10-15T16:53:21+5:30

एनएचएचआय नव्याने मागविणार निविदा; डिस्कोप (कामाला वाव नसणे) या निकषाखाली ते काम रद्द करण्यात आले असून, भविष्यात त्या कामासाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार आहेत.

18 crore favor on the contractor; On the way to Paithan, split the work seven kilometers | कंत्राटदारावर १८ कोटींची मेहरबानी; पैठण मार्गावरील सात किलोमीटर कामाला फाटा

कंत्राटदारावर १८ कोटींची मेहरबानी; पैठण मार्गावरील सात किलोमीटर कामाला फाटा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते पैठण या संतनगरीकडे जातांना भाविकांनी दोन दशकांची परवड सहन केल्यानंतर त्या ४५ कि.मी मार्गाच्या कामाला जानेवारी २०२३ मध्ये सुरुवात झाली. अजूनही त्या मार्गाचे काम पुर्ण झाले नसून सात कि.मी.चे काम नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने वगळून कंत्राटदारावर १८ कोटींची मेहरबानी केल्याची चर्चा आहे.

डिस्कोप (कामाला वाव नसणे) या निकषाखाली ते काम रद्द करण्यात आले असून, भविष्यात त्या कामासाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार आहेत. सेठी आणि मेहरा या कंत्राटदार संस्थांकडे त्या मार्गाचे काम जेव्ही (ज्वॉइंट व्हेंचरशिप) मध्ये देण्यात आले होते. सेठी या कंत्राटदाराकडील ५ व मेहरा या कंत्राटदाराकडील सुमारे दोन कि.मी.चे काम रद्द करून मार्गाच्या कामाचा विषय एनएचएआयने थांबविला आहे. यामुळे कंत्राटदाराला लागणाऱ्या दंडातून सवलत मिळेल, शिवाय नव्याने कामाच्या निविदांचाही घाट घातला जाईल. शहर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे सात कि.मी. अंतरात रस्त्याच्या कामाला स्काेप नसल्याचे कारण एनएचएआयने पुढे केले आहे. बिडकीन परिसरातील हे काम आहे. कामाच्या गुणवत्तेबाबतदेखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कंत्राटदाराचा दोन्ही बाजूंनी फायदा?
सात कि.मी. काम कमी केल्यामुळे कंत्राटदारांनी मुदतीत काम पूर्ण करण्याचा व त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा मुद्दा राहिलेला नाही. ४९० कोटी रुपयांवरून फक्त २८९ कोटींमध्ये म्हणजे ४१.०२ टक्के कमी दरात हे काम दिले होते. यातील जवळपास सर्वच रक्कम अदा केल्याची चर्चा आहे. काम कमी केल्यामुळे कंत्राटदाराचा तिथेही फायदा झाला आहे. सात कि.मी. कामासाठी एमजीपीच्या जलवाहिनीचे टाकण्याचे काम पूर्ण एनएचएआय नव्याने निविदा मागविणार आहे. तेवढ्या सात कि.मी.साठी महागड्या दराने निविदा येतील. त्यात होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार असा प्रश्न आहे. दरम्यान, कंत्राटदार मुदतवाढीसाठी अर्ज करणार असल्याचे समजते.

प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले यांना थेट सवाल...
प्रश्न : मार्गातील किती काम वगळले (डी-स्कोप) केले आहे.
इंगोले : कंत्राटदार जेव्ही मध्ये असून, सात कि.मी.चे काम वगळले आहे.

प्रश्न : वगळलेल्या कामाची रक्कम किती आहे.?
इंगोले : १७ कोटी रुपयांच्या आसपास असेल.

प्रश्न : काम वगळण्याचे मुख्य कारण काय आहे.?
इंगोले : पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनीचे काम न झाल्यामुळे काम वगळले.

प्रश्न : कामाला काही मुदतवाढ दिली आहे काय ?.
इंगोले : नाही, कामाला काहीही मुदतवाढ दिलेली नाही.

प्रश्न : जर काम वगळले आहे तर कंत्राटदाराला किती रक्कम दिली?
इंगोले : याबाबत एनएचएआय वरिष्ठ कार्यालय निर्णय घेतात.

प्रश्न : कंत्राटदारावर मेहरबानी केली आहे काय?
इंगोले : कंत्राटदार लवादात गेला असता, शासनाचे नुकसान झाले असते. मेहरबानीचा प्रश्नच नाही.

Web Title: 18 crore favor on the contractor; On the way to Paithan, split the work seven kilometers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.