भीषण आगीत १८ फर्निचर दुकानांचा कोळसा; हातावर पोट असणारे दुकानदार आले रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 13:28 IST2025-03-21T13:26:42+5:302025-03-21T13:28:06+5:30

विमा नसल्यामुळे शासनाकडून मदतीची अपेक्षा

18 Furniture shops gutted in massive fire; Shopkeepers losses all | भीषण आगीत १८ फर्निचर दुकानांचा कोळसा; हातावर पोट असणारे दुकानदार आले रस्त्यावर

भीषण आगीत १८ फर्निचर दुकानांचा कोळसा; हातावर पोट असणारे दुकानदार आले रस्त्यावर

छत्रपती संभाजीनगर : पवित्र रमजान महिना असल्यामुळे आझाद चौक पहाटे पाच वाजेच्या सुमारास गजबजलेला होता. अनेक जण नमाजसाठी जाण्याच्या तयारीत असतानाच फर्निचरच्या दुकानांना आग लागली. या आगीमुळे ५० हजार रुपयांपासून ते ३ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे दुकानदार रस्त्यावर आले. नागरिकांसह अग्निशमन आणि पोलिस विभागाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, सर्वांचे प्रयत्न तोकडे पडल्याचेही दिसून आले.

दुकानदार कलीम शेख यांच्या औरंगाबाद फर्निचरमध्ये ५० हजार रुपयांचे साहित्य होते. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. दैनंदिन मिळणाऱ्या कामातून कुटुंबाची गुजराण करीत होते. हीच परिस्थिती अयुब खान यांच्या दुकानाची होती. त्यांच्याही दुकानात ८० हजार रुपयांचे साहित्य होते. सय्यद अलताफ यांच्या दुकानात ६० हजारांचे साहित्य होते. अफसर पठाण यांच्या दुकानात ९० हजार, सरदार भाई यांच्या ए.के. फर्निचरमध्ये ८० हजार, सलमान खान यांच्या दुकानात ८० हजार रुपयांचे साहित्य होते. हे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. त्याशिवाय उर्वरित दुकानदारांचेही १ ते ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एकूण १८ दुकानांपैकी वसीम खान यांच्याच राज फर्निचरमध्ये ८ लाख रुपयांचे साहित्य होते. उर्वरित सर्व दुकानदार किरकोळ विक्री करून उदरनिर्वाह करीत असल्याचेही उपस्थितांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील एकाही दुकानदाराने विमा काढलेला नाही. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई ही केवळ शासनाकडून मदत मिळाली तरच होऊ शकते. त्यामुळे आगीमध्ये रस्त्यावर आलेल्या दुकानदारांना शासनाने मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शासनाकडून मदत मिळावी
आगीमध्ये भक्ष्यस्थानी पडलेल्या सर्वच दुकानदारांचे हातावर पोट आहे. दुकानातून काम केले नाही तर कुटुंब चालविणे कठीण आहे. त्यामुळे शासनाच्या विविध यंत्रणांनी नुकसानग्रस्तांनी मदत करावी.
-वाजेद जहागीरदार, दुकान मालक

Web Title: 18 Furniture shops gutted in massive fire; Shopkeepers losses all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.