जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे ४ फुटाने उघडले; ७५ हजार क्यूसेक विसर्गाने गोदावरीला महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 09:06 AM2020-09-18T09:06:13+5:302020-09-18T09:10:25+5:30
गुरुवारी सायंकाळी ६ वाजे पासून विसर्ग वाढविण्यास प्रारंभ करण्यात आला, रात्री १० वाजेपर्यंत ४० हजारा पर्यंत तर मध्यरात्री १२ वाजेनंतर ७५ हजार विसर्ग वाढविण्यात आला होता.
पैठण : अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून गुरुवारी रात्री २५ हजार क्युसेक असा विसर्ग वाढविण्यात आला आहे. हे पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावत असताना दुसरीकडे जायकवाडी धरणाच्या नजीकच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. यामुळे रात्री अचानक धरणाचा जलसाठा १०० टक्क्यांवर गेल्याने जायकवाडी प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजे पासून विसर्ग वाढविण्यास प्रारंभ करण्यात आला, रात्री १० वाजेपर्यंत ४० हजारा पर्यंत तर मध्यरात्री १२ वाजेनंतर ७५ हजार विसर्ग वाढविण्यात आला होता. आवक वाढत असल्याने विसर्गात वाढ केल्याचे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी लोकमतला सांगितले. दरम्यान विसर्ग वाढविण्याची प्रक्रिया रात्री सुरूच होती. धरणाचे सर्व १८ दरवाजे जवळपास ४ फुटाने उचलण्यात आले आहेत.
गुरूवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान धरणाचा जल साठा ९९.२८% होता अचानक एका तासात जलसाठ्याने शंभरी ओलांडल्याने धरणातून विसर्ग १८००० क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. धरणातून विसर्ग वाढविण्याची प्रक्रिया सुरू असताना मुळा धरणातून २५ हजाराचा विसर्ग वाढविण्यात आल्याचा संदेश धरण नियंत्रण कक्षात येऊन धडकला. अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे तातडीने धरणावर हजर झाले. धरणातून ७५,४५६ क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्याचे आदेश काळे यांनी दिले. धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, संदिप राठोड, बंडू आंधारे व तांत्रिक पथकाने धरणातून विसर्ग वाढविण्याची प्रक्रिया टप्प्या टप्प्याने सुरू केली रात्री १० वाजेपर्यंत ४०, हजारा पर्यंत विसर्ग वाढविण्यात आला होता,तर रात्री उशिरा तो वाढवून ७५,४५६ करण्यात आला.
मुळाचे पाणी २२ तासात होते दाखल...
मुळा धरणातून रात्री आठ वाजेच्या दरम्यान २५ हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला होता. विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नगर पाटबंधारे विभागाने वर्तविली असल्याने जायकवाडी प्रशासन सतर्क झाले आहे. मुळा ते पैठण १०१ किलोमीटर अंतर असून मुळाचे पाणी जायकवाडी धरणात २२ तासात दाखल होते. परंतु सध्या नदी भरलेली असल्याने १५ तासाच्या आत हे पाणी जायकवाडी धरणात येईल अशी शक्यता बुद्धभूषण दाभाडे यांनी व्यक्त केली आहे.
पैठण तालुक्यातील १४ गावांना इशारा
जायकवाडी धरणातून मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असताना पैठण तालुक्यातील पैठण कावसान, तेलवाडी चनकवाडी पाटेगाव दादेगाव, वडवाळी, नायगाव, मायगाव, आपेगाव, नवगाव, आवडे उंचेगाव, टाकळी अंबड व हिरडपुरी या गावातील नागरिकांना सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीकाठावरील मालमत्ता गुरे ढोरे दुर घेऊन जावेत असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.