एकाच महिन्यात दुसऱ्यांदा उघडले जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 11:43 AM2024-09-25T11:43:14+5:302024-09-25T11:43:52+5:30

अर्ध्या फूट उंचीने १८  दरवाजे उघडले; गोदावरीत ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग 

18 gates of Jayakwadi dam opened for the second time in a month | एकाच महिन्यात दुसऱ्यांदा उघडले जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे

एकाच महिन्यात दुसऱ्यांदा उघडले जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे

- दादासाहेब गलांडे
पैठण ( छत्रपती संभाजीनगर) :
धरण पाणलोट क्षेत्रासहवरच्या धरणाच्या परिसरात मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने जायकवाडी धरणात ४ हजार १६९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू झाली आहे. तर धरण ९९ .७८ टक्क्यावर पोहोचले आहे. यामुळे आज, बुधवारी ( दि. २५ ) पहाटे १ वाजता १२ दरवाजे तर सकाळी साडेनऊ वाजता ६ अशी १८ दरवाजे उघडून एकूण ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येत असल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे. यापूर्वी ९ सप्टेंबर रोजी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर १५ दिवसांत पुन्हा एकदा जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडून विसर्ग करण्यात येत आहे. 

जायकवाडी धरण ९९.७८%  भरले असून पाणी पातळी १ हजार ५२१.९६ फुटावर गेली आहे. तसेच धरणाच्या वरील भागात आणि पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. यामुळे आज, बुधवारी ( दि. २५ ) पहाटे एक वाजता १२ दरवाजे उघडण्यात आले त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आणखी सहा दरवाजे उघडले असून एकूण १८ दरवाजे अर्धा फूट उंचीने उघडण्यात आले असून गोदापात्रात ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. तसेच धरणाच्या उजव्या कालव्यातून ५०० क्युसेकने पाणी माजलगावसाठी सुरू आहे. गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी केले आहे.

या १८ दरवाज्यातून विसर्ग सुरू
गेट क्रमांक १०, २७, १८, १९, १६, २१, १४, २३, १२, २५, ११, २६, १३, २४, १५, २२, १७, २० असे १८ दरवाजे उघडण्यात आले आहे.

Web Title: 18 gates of Jayakwadi dam opened for the second time in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.