ट्रेडिंग कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून महिला वकिलाची १८ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 04:47 PM2021-11-01T16:47:21+5:302021-11-01T16:47:49+5:30

महिला बचत गटाच्या महिलांनंतर वकील महिलेला चौकडीने फसवले

18 lakh fraud of a woman lawyer by showing the lure of investing in a trading company | ट्रेडिंग कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून महिला वकिलाची १८ लाखांची फसवणूक

ट्रेडिंग कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून महिला वकिलाची १८ लाखांची फसवणूक

googlenewsNext

औरंगाबाद : महिला बचत गटाची स्थापना करत शेळी वाटपाचे आमिष दाखवून सुमारे दीडशे महिलांना गंडविल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. यातील चार आरोपींनी एका वकील महिलेला ट्रेडिंग कंपनीतील गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल १८ लाख १० हजार रुपयांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. वकील महिलेने पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे.

बचत गटाच्या माध्यमातून फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या विकास रामभाऊ मुळे (रा. जटवाडा कॉलनी, हर्सूल) याची न्यायनगरातील एका ३२ वर्षीय वकील महिलेची एका फौजदारी प्रकरणादरम्यान ओळख झाली होती. यावेळी त्याने राजमाता इंटरप्राईजेस या संस्थेमार्फत बचत गटातील महिलांना मोफत शेळी वाटप करत असल्याचे सांगितले. संस्थेसाठी केंद्र शासनाकडून सात कोटींचा निधी आणल्याचेही सांगितले. या व्यतिरिक्त बरेच उपक्रम राबवत असून, स्टार व्हिजन-२१ ही ट्रेडिंग कंपनी सुरू करत असल्याची थाप मारली. गुंतवणुकीसाठी त्याने वकीलबाईंना गळ घातली. दहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दरमहा ५० हजार रु. बँक खात्यावर जमा करण्यात येतील, असेही सांगितले. त्यानुसार महिलेने २७ ऑक्टोबर २०२० रोजी मण्णपूरम गोल्ड लोन कंपनीत सोन्याचे दागिने गहाण ठेवून चार लाख रुपये व नंतर काही रोख रक्कम दिली. नंतर विकासने महिला बँकेच्या समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करतो, तसेच नातेवाइकांना देखील नोकरी लावतो असे म्हणत बँकेसाठी लागणारी स्टेशनरी, फर्निचर, सॉफ्टवेअर आणि फिक्स डिपॉझिट म्हणून आठ लाखांची मागणी केली. महिलेने दोन्ही भावंडांच्या क्रेडिट कार्डवरून डिसेंबरमध्ये दोन लाख ३० हजार आणि शेजारील महिलेचे पाच तोळ्यांचे गंठण व भावांच्या सोन्याच्या अंगठ्या बँकेत गहाण ठेवून पाच लाख रुपये दिले. असे एकूण १८ लाख १० हजार रुपये दिले.

आयुक्तांचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश
तक्रारदार महिलेने पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेतली. आयुक्तांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. मात्र, ३१ ऑक्टोबरपर्यंत एमआयडीसी सिडको पोलिसांनी गुन्हा नोंदविला नसल्याचे महिलेने ‘लोकमत’ला सांगितले.

कंपनीला टाळे
ट्रेडिंग कंपनी सुरू झाल्यामुळे विकास कधी पाच, तर कधी दहा हजार रुपये महिन्यातून खात्यावर जमा करू लागला. ३० मार्चपर्यंत पूर्ण पैसे देण्याचे आश्वासन दिले. नंतर टाळाटाळ सुरू केली. कालांतराने कोरोना काळात त्याने गोल्डन सिटी सेंटरमधील ट्रेडिंग कंपनीला टाळे ठोकले. तसेच राजमाता इंटरप्राईजेसचे कार्यालयदेखील बंद केले.

Web Title: 18 lakh fraud of a woman lawyer by showing the lure of investing in a trading company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.