मनपाच्या निव्वळ घोषणा! १८ लाख लोकसंख्येच्या छत्रपती संभाजीनगरात एक भाजीमंडई धड नाही

By मुजीब देवणीकर | Published: February 5, 2024 06:01 PM2024-02-05T18:01:19+5:302024-02-05T18:01:36+5:30

बीओडी तत्त्वावर औरंगपुरा भाजीमंडईचे काम १२ वर्षांपासून सुरू आहे. शॉपिंग कॉम्पलेक्सचे कामही अर्धवट आहे.

18 lakh population of Chhatrapati Sambhajinagar; Not a single vegetable market! Harassment for common people as well as sellers | मनपाच्या निव्वळ घोषणा! १८ लाख लोकसंख्येच्या छत्रपती संभाजीनगरात एक भाजीमंडई धड नाही

मनपाच्या निव्वळ घोषणा! १८ लाख लोकसंख्येच्या छत्रपती संभाजीनगरात एक भाजीमंडई धड नाही

छत्रपती संभाजीनगर : शहराची लोकसंख्या १८ लाखांहून अधिक असल्याचे बोलले जाते. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी महापालिकेने एकही चांगली सुसज्ज भाजीमंडई उभारलेली नाही. सर्वांत मोठ्या शहागंज भाजीमंडईची महापालिकेनेच बीओटीच्या नावावर वाताहत केली. औरंगपुरा भाजी मंडईचे बांधकाम १२ वर्षांपासून सुरू आहे. टीव्ही सेंटर भाजीमंडई अतिक्रमणांच्या विळख्यात सापडून संपुष्टात आली. एन-११ भागातील मंडई अजून कागदावरच आहे. शहानूरमियाँ दर्गा भागातील जागेवर युरोपियन मार्केटच्या नावावर निव्वळ आठवडी बाजार भरतोय, हे विशेष.

शहराला सध्या किमान १० पेक्षा अधिक मोठ्या भाजीमंडईची गरज आहे. एकाच ठिकाणी ताजा आणि सर्व भाजीपाला मिळेल असे एकमेव चांगले ठिकाणच नाही. त्यामुळे भाजीपाला विक्रेते रस्त्याच्या कडेला जिथे जागा मिळेल, तेथे विक्री करीत आहेत. अशा भाजीपाला विक्रीच्या केंद्रांची संख्या वाढू लागली. मुळात भाजी मंडईची सुविधा उपलब्ध करून देण्याचे दायित्व महापालिकेवर आहे. या दायित्वापासून प्रशासन पळ काढत असल्याचे चित्र पाहायला मिळते. सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे अहिंसानगर ते सेव्हन हिल, सातारा-देवळाई, पैठण रोड, पडेगाव रोड, जटवाडा रोड, इ. भागात राहणाऱ्या लाखो नागरिकांसाठी हक्काची एकही भाजीमंडई नाही.

शहागंज मंडईची चित्तरकथा
शहागंज भाजी मंडईच्या आसपास महापालिकेच्या मालकीची नऊ एकरपेक्षा जास्त जागा असल्याचा दावा करण्यात आला. या ठिकाणी भव्य बीओटी प्रकल्प उभारून अद्ययकवत भाजीमंडईचे स्वप्न नागरिकांना दाखविण्यात आले. जुनी भाजीमंडई १२ वर्षांपूर्वी बुलडोझर लावून पाडण्यात आली. मालकी हक्काच्या वादामुळे महापालिकेने बीओटीचा प्रस्तावच गुंडाळून ठेवला. आता या ठिकाणी मोजकीच दुकाने, रस्त्यावर थोड्या फार प्रमाणात भाजीपाला विक्री सुरू आहे.

औरंगपुरा मंडई स्वप्नवत
बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्पलेक्स, भाजीमंडई उभारण्यासाठी मनपाने औरंगपुऱ्यातील चांगली भाजीमंडई जमीनदोस्त केली. काही छोट्या व्यापाऱ्यांना पर्यायी दुकाने दिली. भाजी मंडई बाजूला नाल्याजवळ हलविली. १२ वर्षांनंतरही बीओटीची इमारत पूर्णपणे सुरू झाली नाही. जिथे पर्यायी भाजी मंडई आहे, तिथे सुविधा नाहीत. ग्राहक फारसे फिरकत नाहीत.

संजय गांधी मार्केट
सिडको-हडको भागातील नागरिकांसाठी टीव्ही सेंटर येथील संजय गांधी मार्केटचा मोठा आधार होता. हळूहळू या ठिकाणी अतिक्रमणे आणि दुकानांचे स्वरूप बदलत गेले. आता येथेही बोटावर मोजण्याएवढेच भाजीपाला विक्रेते शिल्लक राहिले आहेत.

एन-११ येथील भाजीमंडई
ताठे मंगल कार्यालयाजवळ छोटे-छोटे ओटे उभारून भाजीमंडई उभारणीस प्रशासक जी. श्रीकांत यांनी अलीकडेच मंजुरी दिली. अद्याप निविदा प्रक्रिया सुरू आहे. भाजीमंडई कधी होईल, हे निश्चित नाही. या भागात ठिकठिकाणी रस्त्यावरच भाजीपाला विक्रेते बसतात.

नियोजन आणि काम सुरू
औरंगपुरा मंडई जुन्या जागेवर लवकरच सुरू होणार आहे. एन-११ मध्ये भाजीमंडई करतोय. मुकुंदवाडीतील मंडई पुन्हा नव्याने उभारण्याचा प्रस्ताव आहे. चिकलठाणा येथेही भाजीमंडई उभारणार आहोत. शहानुरमियाँ दर्गा येथील युरोपीयन मार्केटचे ओटे उंच झाले. त्यावरही विचार सुरू आहे. रस्त्यावरील विक्री बंदी करायची आहे. त्रिमूर्ती चौकात मंडईत व्यापाऱ्यांनी बसावे असा प्रयत्न आहे. नवीन विकास आराखड्यात भाजीमंडईसाठी आरक्षण टाकावे, अशी सूचना केली आहे.
- ए. बी. देशमुख, अतिरिक्त शहर अभियंता, मनपा.

Web Title: 18 lakh population of Chhatrapati Sambhajinagar; Not a single vegetable market! Harassment for common people as well as sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.