औरंगाबाद शहरातील १८ वॉर्डांना पाच दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:08 AM2018-05-21T00:08:50+5:302018-05-21T00:09:41+5:30

शहरातील प्रत्येक वॉर्डाला समान पाणी मिळावे या हेतूने ११ मेपासून तीन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. मागील दहा दिवसांमध्ये एकाही वॉर्डाला तीन दिवसाआड पाणी मिळाले नाही.

For 18 wards in Aurangabad city, five days water | औरंगाबाद शहरातील १८ वॉर्डांना पाच दिवसांआड पाणी

औरंगाबाद शहरातील १८ वॉर्डांना पाच दिवसांआड पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देनियोजनाची ऐसीतैशी : तीन दिवसांआड पाणी देण्याची घोषणा हवेतच; सणासुदीच्या दिवसांत पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील प्रत्येक वॉर्डाला समान पाणी मिळावे या हेतूने ११ मेपासून तीन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. मागील दहा दिवसांमध्ये एकाही वॉर्डाला तीन दिवसाआड पाणी मिळाले नाही. पाणीपुरवठ्यातील संपूर्ण नियोजनच कोलमडले असून, मे हिटच्या तडाख्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. शहागंज पाण्याच्या टाकीवर अवलंबून असलेल्या १८ वॉर्डांची अवस्था सर्वाधिक बिकट आहे. ऐन रजमान महिन्यात या भागातील नागरिकांना चक्क पाच दिवसाआड म्हणजेच सहाव्या दिवशी पाणी देण्याचा पराक्रम महापालिका प्रशासन करीत आहे.
उन्हाळा सुरू झाल्यापासून शहरात पाणीपुरवठ्याची ओरड सुरू आहे. जायकवाडीहून मुबलक प्रमाणात पाणी येत आहे. महापालिकेकडे नियोजन नसल्याने सर्वत्र पाण्यासाठी ओरड होत आहे. सिडको-हडको भागात रविवारी सर्वाधिक पाणीपुरवठ्याची ओरड सुरू होती. टी.व्ही. सेंटर परिसरातील विविध वसाहतींना रविवारी पाणी येणार होते. मात्र, नियोजित वेळेत पाणीच आले नाही. अशीच अवस्था भावसिंगपुरा भागातील संगीता कॉलनी आणि इतर वसाहतींमध्ये होती. या भागाला रेल्वेस्टेशन येथून मेन लाईनवरून पाणी देण्यात येते. फारोळा येथील पाणीपुरवठ्याचे पंप तब्बल एक तास बंद होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना रविवारी निर्जळीचा सामना करावा लागला. यापूर्वी जेव्हा भावसिंगपुरा भागातील नागरिकांना पाण्याचा टप्पा होता तेव्हासुद्धा पाणीच आले नव्हते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. आठ ते दहा दिवस निर्जळीचा कसा सामना करावा, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
एमआयडीसीच्या पाण्याचे गाजर
शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिकेने एमआयडीसी प्रशासनाकडे पाच एमएलडी पाण्याची मागणी केली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही मागील महिन्यातच पाणी देण्यास तत्त्वत: मंजुरीही दिली होती. मे महिना संपत आला तरी मनपाला एमआयडीसीकडून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. सिडको एन-१ भागात एमआयडीसीचे पाणीपुरवठा केंद्र आहे. या केंद्रावरून पाण्याचे सर्व टँकर भरण्यात येतील. त्यासाठी २ एमएलडी पाणी घेण्यात येईल. उर्वरित ३ एमएलडी पाणी सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीत आण्यात येईल. सातारा-देवळाई भागातही एमआयडीसीचे २ एमएलडी पाणी देण्यात यावे, असा ठरावही सर्वसाधारण सभेत मागील महिन्यात मंजूर करण्यात आला होता. पाणी येण्यापूर्वीच महापालिकेने पाण्याचे नियोजनही करून ठेवले आहे. मे महिना संपत आला तरीसुद्धा पाणी आले नाही. औरंगाबादकरांसह सातारा-देवळाई भागातील लाखो नागरिकांना एमआयडीसीच्या पाण्याचे निव्वळ गाजर दाखविण्याचे काम महापालिकेने केल्याचे दिसून येत आहे.
कोणालाच देणे-घेणे नाही
पाणीपुरवठा विभागात पूर्वी कर्मचारी नाहीत, अशी ओरड अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून या विभागाला १०० पेक्षा अधिक लाईनमन, अधिकारी देण्यात आले आहेत. यानंतरही पाणीपुरवठ्यात किंचितही सुधारणा झालेली नाही. पाणीपुरवठा वेळेवर का होत नाही, याचे उत्तर वरिष्ठ अधिकाºयांपासून कनिष्ठ कर्मचाºयांपर्यंत नाही. प्रत्येक जण एकमेकांकडे बोट दाखवून मोकळे होण्याचे धोरण बजाविण्यात येत आहे.
शहागंजवर अन्याय का?
रमजान महिन्याला सुरुवात होऊन चार दिवस झाले. शहागंज पाण्याच्या टाकीवर जवळपास १८ वॉर्ड अवलंबून आहेत. या भागातील नागरिकांना ५ दिवसाआड म्हणजेच सहाव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. सहा दिवस पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या भागातील गोरगरीब नागरिकांकडे नाही. त्यामुळे मे हिटच्या तडाख्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Web Title: For 18 wards in Aurangabad city, five days water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.