घाटीतील प्रसूती विभागात १८० खाटा, प्रत्यक्षात तब्बल २५२ महिला दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:05 AM2021-02-26T04:05:02+5:302021-02-26T04:05:02+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागात ९० खाटा मंजूर आहेत. प्रत्यक्षात या खाटा १८० ...
औरंगाबाद : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागात ९० खाटा मंजूर आहेत. प्रत्यक्षात या खाटा १८० करण्यात आल्या. कारण प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. परंतु, या १८० खाटाही अपुऱ्या पडत आहेत. आजघडीला २५२ महिला या विभागाच्या विविध वाॅर्डांत दाखल झाल्या आहेत. बेड कमी आणि बाळंतपणासाठी आलेल्या महिलांची संख्या आहे. त्यामुळे जमिनीवर गादी टाकून बाळंतीण महिलेला उपचार घ्यावे लागत आहेत.
घाटीत प्रसूतीशास्त्र विभागाच्या अंतर्गंत वाॅर्ड २७ ते ३० असे चार वाॅर्ड आहेत. यात वाॅर्ड २७ हा गर्भपात, गर्भपिशवीच्या शस्त्रक्रिया होणाऱ्या महिलांसाठी आहे. परंतु, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याने या वाॅर्डातही महिलांना दाखल करावी लागते. बाळंतपणापूर्वीच्या, बाळंतपण झालेल्या सिझर आणि नैसर्गिक प्रसूतीच्या वाॅर्डात जमिनीवर गाद्या टाकून महिलांवर उपचार होत असल्याचे चित्र रोजचेच आहे. दाखल महिलांची संख्या असल्याने पाणी, स्वच्छतेचा प्रश्न आहे. वाॅर्डातील पिण्याचे पाणी संपून जाते. त्यामुळे विकतचे पाणी नातेवाईकांना आणावेे लागते. रेफरचे प्रमाण अधिक आहे. अधिक रुग्णांमुळे औषधी बाहेरून आणण्याची वेळही नातेवाईकांवर ओढवते. केवळ रुग्णांना जेवण दिले जाते. परंतु, नातेवाईकांना जेवण दिले जात नाही. प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले, विभागात उपलब्ध नसलेली औषधीच लिहून दिली जातात. मंजूर खाटांपेक्षा अधिक खाटांद्वारे सेवा दिली जात आहे.
---
कालच प्रसूती झाली. मुलगी झाली आहे. घाटीचा मोठा आधार मिळाला, पण प्रसूतीपूर्वी काही औषधी बाहेरून आणावी लागली. औषधी घाटीतून मिळाली तर आणखी सुविधा होईल.
- गायत्री जाधव, बाळंतीण
----
सुनेला घेऊन आम्ही घाटीत आलो. तिला मुलगी झाली आहे. घाटीतील सुविधा चांगल्या वाटतात. डाॅक्टर वेळेवर येऊन विचारपूस करून गेले. केवळ गर्दी अधिक असल्याने जमिनीवर गादी टाकून थांबावे लागले.
-रफीया बेगम, नातेवाईक
------
वाॅर्डात २४ तास डाॅक्टर, वरिष्ठांचेही वेळेवर राऊंड
१)प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रत्येक वाॅर्डात २४ तास ज्युनिअर डाॅक्टर हजर असतात. त्यांच्याकडून प्रत्येक रुग्णाकडे लक्ष ठेवले जाते.
२) ज्युनिअर डाॅक्टर आधी राऊंड घेतात. त्याबरोबर सीआर, पथकप्रमुख आणि विभागप्रमुखही रुग्णांचा नियोजित वेळेवर राऊंड घेतात.
३)राऊंडची वेळ नसतानाही एखादा रुग्णांच्या प्रकृतीसंदर्भात काही बाबी उद्भवल्यास वरिष्ठ डाॅक्टर वाॅर्डात पोहोचतात.
---------
उपलब्ध खाटा दाखल महिला
१)बाळंतपणासाठी
महिला आल्यानंतर- ४० ३७
२)बाळंतपणनंतर
सीझर खाटा -५६ ७४
३)बाळंतपणानंतर
नाॅर्मलच्या खाटा -४६ ७०
------
वाॅर्ड क्रमांक ३० मध्ये अशाप्रकारे बाळंतीण महिलांना जमिनीवर थांबावे लागते.