तीन वर्षांमध्ये छत्रपती संभाजीनगरात १८४ पेडलर्स अटकेत, तरीही नशेखोरीचा आलेख वाढताच
By सुमित डोळे | Published: October 24, 2023 12:10 PM2023-10-24T12:10:08+5:302023-10-24T12:11:03+5:30
मुंबईच्या ग्रँटरोडपर्यंत पोहोचले होते तपासाचे धागेदोरे, परंतु तपासात सातत्य राहिले नाही
छत्रपती संभाजीनगर : गेल्या तीन वर्षांमध्ये शहरात अमली पदार्थांच्या एकूण १५५ कारवायांत १८४ नशेखोर, अमली पदार्थांचे पुरवठादार पकडले गेले. यात जवळपास हजारो गोळ्या, नशेली पदार्थांच्या बाटल्या जप्त झाल्या. तरीही शहरातील नशेखोरीचा वेग दुपटीने वाढला. यात प्रामुख्याने एनडीपीएस पथक, पुंडलिकनगर, सिटीचौक, एटीएसच्या कारवाईत अमली पदार्थ सापडले. जुलै महिन्यातच मुंबईच्या ग्रँटरोडपर्यंत पोलिसांचे तपासाचे धागेदोरे पोहोचले होते. मात्र, त्यानंतर तपासात सातत्यच न राहिल्याने, गुन्हेगारांच्या साखळी पद्धतीच्या रॅकेटमुळे पोलिस शेवटपर्यंत पोहाेचू शकले नाही.
तीन वर्षांपूर्वी शहरातील वाढती नशेखोरी रोखण्यासाठी एनडीपीएस पथकाच्या स्थापनेनंतर कारवाया वेगाने वाढल्या. अमली पदार्थांपेक्षा नशेच्या गोळ्या, पातळ औषधांद्वारे नशा करण्याचे प्रमाण अधिक आहे. पावडर, कोकेन, चरसचा वापर उच्चभ्रू वसाहती, कुटुंबातील मुलांमध्ये सर्वाधिक आहे. पथकाने नशेच्या गोळ्या, खोकल्याच्या औषधांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. मात्र, अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे वर्तुळ अत्यंत गोपनीय पद्धतीने चालत असल्याने त्यांच्यापर्यंत ठोस पुराव्यांसह पोहोचण्यात पथकाला अडचणी आल्या.
नऊ महिन्यांत सर्वाधिक आरोपी
वर्षे कारवाया आरोपी गांजा नशेच्या गोळ्या औषधी बाटल्या पावडर चरस
२०२२, ५८- ९९- १४९.५९९ कि.ग्रॅ- १३७६२- ३४५- ५.७३.०३ ग्रॅ. १९४.०६ ग्रॅ.
२०२३ (सप्टेंबर) ५९- ८५- ९३.८०२- कि.ग्रॅ १५४२- ५९९ - _ १४३.१२ ग्रॅ.
जुलै महिन्यात मुंबईपर्यंत पाेहोचले पोलिस
जुलै महिन्यात उच्चभ्रू कुटुंबातली मुले नशा करताना रंगेहात पकडली गेली होती. त्यात पुंडलिकनगर पोलिसांनी अनिल अंबादास माळवे (वय ५१, रा. प्रकाशनगर) याला एमडी ड्रग्ज व चरस, गांजासह अटक केली. माळवे हा पेडलर्सचा शहरातील मुख्य एजंट आहे. त्याच्या चौकशीत मुंबईच्या ग्रँट रोडवर मुख्य तस्करांना भेटून हे पदार्थ आणले जात असल्याचे सिद्ध झाले होते, तर त्याच आठवड्यात एटीएसच्या कारवाईत मोहम्मद अदनान शेख अशरफ (२७, रा. गणेश कॉलनी) हा ४ लाख ९३ हजार रुपयांच्या २४६.५० ग्रॅम चरससह पकडला गेला होता. अदनान, अनिलसह अन्य एजंटही व्हॉट्सॲप, टेलिग्रामवर एकमेकांच्या संपर्कात राहतात. संपर्क होताच चॅट, कॉल हिस्टरी डिलिट करतात. दर दहा, पंधरा दिवसांनी रेल्वेद्वारे मुंबईवरून तस्करी होते.