घाटीत १.८८ लाख कोरोना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:05 AM2021-02-16T04:05:01+5:302021-02-16T04:05:01+5:30
जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ पूर्वीप्रमाणे करण्याची मागणी औरंगाबाद : जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलण्यात आली आहे. या नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे मुंबईत ...
जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ
पूर्वीप्रमाणे करण्याची मागणी
औरंगाबाद : जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलण्यात आली आहे. या नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे मुंबईत पोहोचेपर्यंत शासकीय कार्यालये बंद होतात. मुंबईत राहण्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ पूर्वीप्रमाणे करावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी केली आहे.
सिद्धार्थ उद्यान खुले करण्याची मागणी
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाचे अध्यक्ष निसार अहेमद खान यांनी केली आहे. बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत; परंतु हे उद्यान अजूनही बंद आहे. नागरिक, बालकांसाठी हे सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
घाटीत बेबी किटचे वितरण
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रविवारी महावीर इंटरनॅशनल मेट्रो सिटीतर्फे प्रसूतिशास्त्र विभागाच्या वॉर्डात २०० बेबी किट्सचे वितरण करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, महावीर इंटरनॅशनल मेट्रो सिटीचे अध्यक्ष राजकुमार बांठिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे , डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. अमोल खडसे, डॉ. शोएब पटेल , डॉ. तानाजी भोजने, लक्ष्मीकांत शिंगोटे, ललित गांधी, पूनम सुराना, सुप्रिया सुराणा, कल्पना आंचलिया, आनंद वाघ, प्रवीण बांठिया, धनराज बांठिया, संतोष कावळे, प्रतीक आंचलिया, विवेक बागरेचा उपस्थित होते.
शहरातील किमान तापमानात पुन्हा वाढ
औरंगाबाद : शहरातील तापमानात चढ-उतार होणे सुरूच आहे. शहरात ११ फेब्रुवारी रोजी १३.१ अंश इतके किमान तापमान होते; परंतु चारच दिवसांत पुन्हा किमान तापमानात वाढ झाली. त्यामुळे थंडी पुन्हा गायब झाली आहे. चिकलठाणा वेधशाळेत सोमवारी १६.६ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.
घाटीत २८६ कर्मचारी पाॅझिटिव्ह
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात गेल्या दहा महिन्यांत दोन हजार ५०० डाॅक्टर, परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात आतापर्यंत २८६ कर्मचारी पाॅझिटिव्ह आढळून आले. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी घाटीतील कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र परिश्रम घेतले.