कायद्याची कठोर अंमलबजावणी करताना पोलिसांवर १९ हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:03 AM2021-01-13T04:03:56+5:302021-01-13T04:03:56+5:30
औरंगाबाद : कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेकदा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. यातून सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण आणि ...
औरंगाबाद : कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेकदा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. यातून सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण आणि धमकावण्याच्या घटना घडतात. औरंगाबाद शहरात गतवर्षी २०२० मध्ये ४२ शासकीय सेवकांना मारहाण झाली. यात सर्वाधिक १९ पोलिसांचा समावेश असल्याची माहिती समोर आली.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद आता चळवळीचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. शहराच्या वाढत्या औद्योगिकीकरणासोबत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. शहराच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्तालय असून, त्यांतर्गत कार्यरत १७ पोलीस ठाणे, गुन्हेशाखा आणि वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी कायद्याची अंमलबजावणी करताना नागरिक हिंसक होऊन पोलिसांना धक्काबुक्की आणि मारहाण करतात. विभागीय शहर असलेल्या औरंगाबादमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, मराठवाड्यातील सर्वात मोठे घाटी रुग्णालय, विभागीय आयुक्तालय, पोलीस आयुक्तालय, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण कंपनी, आरोग्य विभाग यांच्यासह अन्य विभागीय आणि स्थानिक शासकीय कार्यालये आहेत. शासकीय काम करीत असताना अनेकजण अधिकारी, कर्मचारी याच्यासोबत हुज्जत घालून त्यांच्या कामात अडथळा आणतात. शासकीय कामात अडथळा आणणे, त्यांना मारहाण करणे आणि धमकी देणाऱ्या नागरिकांवर भादंवि कलम ३५३नुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. हा गुन्हा अजामीनपात्र असल्यामुळे आरोपीला अटक केली जाते.
२०२०मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या ४२ घटना घडल्या. यापैकी सर्वाधिक असे १९ पोलिसांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून मारहाणीचा सामना करावा लागल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली.
नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना बऱ्याचदा वाहतूक पोलिसांसोबत वाहनचालक वाद घालून त्यांना मारहाण केल्याच्या तीन घटना २०२०मध्ये झाल्या.
चौकट
पोलीस विभागानंतर महापालिका, महावितरण, आरोग्य विभाग, वनविभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना हिंसक प्रवृत्तीच्या लोकांकडून धक्काबुक्की, शिवीगाळचा सामना करावा लागतो. काहीवेळा आंदोलनाच्या नावाखाली शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर हात उचलण्याचे प्रकार राजकीय पदाधिकारी करतात.
चौकट
२०१९मध्ये ५९ घटनांची नोंद
कोविडकाळात महापालिका कर्मचारी आणि घाटी रुग्णालयातील डॉक्टर आणि पोलिसांना मारहाणीचा सामना करावा लागला. असे असले तरी सन २०१९ तुलनेत २०२०मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ले घटले. सन २०१९मध्ये पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सरकारी सेवकांना मारहाणीच्या ५९ घटना घडल्या होत्या. गतवर्षी यात १७ने घट होऊन ४२ घटनांची नोंद झाली.