राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस, तर २९ लाखांची विनाआधारकार्ड नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 12:37 PM2022-03-03T12:37:03+5:302022-03-03T12:38:13+5:30
शिक्षण विभागाने खंडपीठात सादर केली माहिती; राज्यात २४ लाख बोगस विद्यार्थी असल्याचा याचिकेत दावा
औरंगाबाद : राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस असल्याची, तर २९ लाखांची विनाआधारकार्ड नोंदणी झाली असल्याची माहिती शिक्षण विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केली. राज्यात २४ लाख बोगस विद्यार्थी असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान ही माहिती देण्यात आली.
१० वर्षांपूर्वी बोगस पटपडताळणी मोहिमेत २० लाख बोगस विद्यार्थी सापडले होते. या बोगस विद्यार्थीसंख्येला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांची आधारकार्डद्वारे नोंदणी करण्यात आली. तरीही बोगस विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली नाही. उलट ती वाढली. विशेष म्हणजे, राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्डच बोगस असल्याचे समोर आले आहे. तर, २९ लाख विद्यार्थ्यांची विनाआधारकार्ड नोंदणी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
राज्यात तब्बल २४ लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करणारी जनहित याचिका बीड जिह्यातील ब्रिजमोहन मिश्रा यांनी ॲड. सचिन देशमुख यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. त्यात खासगी शाळांचे संस्था संचालक, मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करण्यात आला होता. बोगस विद्यार्थीसंख्येची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर खंडपीठाने ऑनलाइन पद्धतीने आधारकार्डसोबत जोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यात राज्य सरकारने सादर केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांत किती बोगस विद्यार्थी ?
पुणे -२,४३,५८२ , नागपूर - १,८४,२६२ , जळगाव - १,७२,५४३ , नांदेड - १, ५२, ७२३ , यवतमाळ - १,१७.५१९, बुलडाणा - ९८,४८८ , धुळे - ८५,१५७ , मुंबई - ८०,८०० , नाशिक - २५३ , अहमदनगर - ६०,९५१, अकोला - ५६,४७८ , अमरावती - ५,१०७ , औरंगाबाद - १०,६६६ आणि बीड -८,५२८.