खत, बियाणे विक्रीवर राहणार १९ पथकांची नजर
By Admin | Published: June 2, 2014 12:09 AM2014-06-02T00:09:05+5:302014-06-02T00:51:55+5:30
उस्मानाबाद : खरीप पेरणीपूर्व मशागतीचे कामे उरकली असून शेतकरी आता बी-बियाणे आणि खत खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.
उस्मानाबाद : खरीप पेरणीपूर्व मशागतीचे कामे उरकली असून शेतकरी आता बी-बियाणे आणि खत खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. त्यानुषंगाने कृषी विभागानेही आवश्यक तयारी केली आहे. खत-बियाणे कर्मचार्यांच्या उपस्थितीत विकणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार कर्मचारीही नियुक्त करण्यात आले असून १९ पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. खरीप हंगामध्ये शेतकर्यांना रास्त दरामध्ये खत, बी-बियाणे उपलब्ध व्हावे, बोगस बियाणे त्यांच्या माथी मारले जावून नये यासाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये नऊ भरारी पथके, १० दक्षता पथके तर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकामध्ये जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, वजन-मापे निरीक्षक आणि मोहीम अधिकारी असणार आहेत. तसेच तालुकास्तरीय पथकामध्ये तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, वजन-मापे निरीक्षक, मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकार्यांचा समावेश असणार आहे. भरारी पथकांसोबतच दहा दक्षता पथकेही गठित करण्यात आली आहेत. उपविभागीय स्तरावर दोन तर तालुकस्तरावर ही पथके कार्यरत असणार आहेत. उपविभागीय पथकात उपविभागीय कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी अणि पंचायत समिती कृषी अधिकार्यांचा समावेश असेल. तालुकास्तरावरील पथकामध्ये तालुका व पंचायत समिती कृषी अधिकार्यांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामध्ये मोहीम अधिकारी आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्व पथके खत, बियाणे विक्रीवर नजर ठेवून असतील, असे कृषी विकास अधिकारी मिणीयार म्हणाले. कृषी केंद्रावर कर्मचारी खत, बी-बियाण्याची विक्री कर्मचार्यांसमक्ष करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उस्मानाबाद तालुक्यात ५२, तुळजापूर ४६, लोहारा ३०, उमरगा ७०, कळंब २३, वाशी ३६, भूम ३३ तर परंडा तालुक्यात ५३ कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मोहीम अधिकारी डॉ. चिमनशेट्टे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.