मुख्यमंत्र्यांकडून जुनी जलवाहिनी बदलण्यास १९० कोटी मंजूर, वाढीव पाणी मिळण्याचा मार्ग खुला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 08:10 PM2022-08-01T20:10:12+5:302022-08-01T20:10:47+5:30

१,६८० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते अडीच वर्षे लागण्याची शक्यता आहे.

190 crore approved by the Chief Minister to replace the old water channel, the way to get additional water is open | मुख्यमंत्र्यांकडून जुनी जलवाहिनी बदलण्यास १९० कोटी मंजूर, वाढीव पाणी मिळण्याचा मार्ग खुला

मुख्यमंत्र्यांकडून जुनी जलवाहिनी बदलण्यास १९० कोटी मंजूर, वाढीव पाणी मिळण्याचा मार्ग खुला

googlenewsNext

औरंगाबाद : नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत जुनी ७०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी बदलण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. १९० कोटी रुपये खर्च करून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनी बदलण्यात येईल. या प्रस्तावाला रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.

१,६८० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते अडीच वर्षे लागण्याची शक्यता आहे. तूर्त औरंगाबाद शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. उन्हाळ्यात तर पाणीप्रश्न अधिक गंभीर बनतो. नवीन योजना पूर्ण होईपर्यंत १९७५ साली टाकण्यात आलेली जुनी जलवाहिनी बदलण्याचा पर्याय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सूचविण्यात आला होता. त्यांनी तातडीने प्रस्ताव दाखल करा, असे आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अंदाजपत्रक तयार करून शासनाला सादर केले होते. जवळपास १९० कोटी रुपये जलवाहिनी बदलण्यास खर्च येणार आहे. सध्या या जलवाहिनीतून ३० ते ३५ एमएलडी एवढेच पाणी येत आहे. जलवाहिनी बदलल्यानंतर शहराला किमान ६५ ते ७० एमएलडी पाणी मिळेल, असा अंदाज तज्ज्ञांना आहे. या जलवाहिनीमुळे शहरात वाढीव पाणीही येईल.

‘लोकमत’चा पाठपुरावा
शहराची तहान भागविण्यासाठी ७०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी बदलण्यासाठी ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनानिमित्त जिल्ह्यातील रखडलेल्या प्रस्तावांवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जलवाहिनी बदलण्यासाठी १९० कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा केली.

काम मनपा करणार?
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अगोदरच १,६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सोपविण्यात आले आहे. त्यात आता आणखी जलवाहिनीचे काम दिल्यास मुख्य योजनेच्या कामाला विलंब होऊ शकतो. त्यामुळे जलवाहिनी बदलण्याचे काम मनपाकडे सोपविण्यात येऊ शकते, असे सुतोवाच दोन दिवसांपूर्वीच प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले होते.

Web Title: 190 crore approved by the Chief Minister to replace the old water channel, the way to get additional water is open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.