२६ दिवसांत १९२ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:02 AM2021-03-29T04:02:26+5:302021-03-29T04:02:26+5:30
औरंगाबाद : कोरोनाचा कहर सुरूच आहे. दररोज दीड ते दोन हजार नागरिक पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यातच मृत्यूची संख्याही ...
औरंगाबाद : कोरोनाचा कहर सुरूच आहे. दररोज दीड ते दोन हजार नागरिक पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यातच मृत्यूची संख्याही मागील दोन दिवसांपासून अफाट वाढली आहे. १८ ते २१ रुग्णांचा दररोज मृत्यू होत आहे. मार्च महिन्याला अजून तीन दिवस शिल्लक असले तरी मृत्यूची संख्या महिनाभरात तब्बल १९२ पर्यंत पोहोचली आहे. ही आकडेवारी एकट्या शहरातली आहे. जिल्ह्यातील मृतांची संख्याही या महिन्यात बरीच वाढलेली आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा म्हणून प्रशासनाने मागील महिनाभरात सर्व उपाययोजना केल्या. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी प्रशासनाला ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून ८ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्याचा कठोर निर्णय शनिवारी घ्यावा लागला. या निर्णयामुळे कोरोनाची साखळी ब्रेक होण्यासाठी मदत होईल, असा कयास प्रशासनाचा आहे. पॉझिटिव्ह आलेले आणि गंभीर असलेले रुग्ण सध्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत. मागील दोन दिवसांत मृत्यूचे आकडे थक्क करणारे आहेत. शुक्रवारी १८ तर शनिवारी २१ नागरिकांचा मृत्यू झाला. १ ते २६ मार्चपर्यंत शहरातील १९२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १६ ते २६ या दहा दिवसांमध्ये तब्बल १६० नागरिकांचा मृत्यू झाला हे धक्कादायक.
वर्षभरात सर्वाधिक मृत्यू मार्चमध्ये
मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाला सुरुवात झाली होती. जून २०२० मध्ये सर्वाधिक १९१ नागरिकांचा मृत्यू झाला होता. जुलै २०२० मध्ये १६९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यंदा ३१ मार्चपर्यंत आणखी मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
संशयित रुग्णांनी तपासण्या वेळेवर कराव्यात
ताप, सर्दी, खोकला असेल तर नागरिकांनी आजार अंगावर काढू नये. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तपासणी करून घ्यावी. वेळेवर उपचार मिळाले तर रुग्णांना वाचविणे थोडेफार शक्य होते, असे महापालिकेतील आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे.