१९६५ संशोधकांना प्रतिमहिना मिळते सात कोटी रुपये शिष्यवृत्ती; देशातील एकमेव विद्यापीठ
By राम शिनगारे | Published: June 19, 2023 12:22 PM2023-06-19T12:22:36+5:302023-06-19T12:23:16+5:30
विद्यापीठातील १९६५ संशोधक विद्यार्थ्यांना सरासरी ३५ हजार रुपये प्रतिमहिना
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधन करणाऱ्या १९६५ विद्यार्थ्यांना प्रतिमहिना सात कोटी रुपयांपेक्षा अधिक शिष्यवृत्ती मिळत आहे. हा आकडा प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारांपेक्षा अधिक आहे. राज्य शासनाच्या संस्थांकडून १३०२, तर केंद्र शासनाच्या संस्थांकडून ६६३ विद्यार्थ्यांना सरासरी ३५ हजार रुपये प्रतिमहिना शिष्यवृत्ती देण्यात येते. एवढ्या मोठ्या प्रमाणात संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळविणारे हे देशातील एकमेव विद्यापीठ असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
मराठवाड्यातील युवकांमध्ये जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याच्या तयारीमुळे विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत. आता मराठवाड्यातील युवकांनी संशोधनातही आघाडी घेतल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तब्बल १९६५ संशोधकांना राज्य, राष्ट्रीय स्तरावरील संस्थांकडून शिष्यवृत्ती मिळते. प्रतिमहिना शिष्यवृत्तीचा आकडा सात कोटी रुपयांपेक्षा अधिक असून, वार्षिक ८० कोटी रुपयांपेक्षा अधिक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळते. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, विद्यापीठात शिक्षणासाठी येणारे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील तरुण प्रचंड मेहनती आहेत. हे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील विविध परीक्षांमध्ये यश मिळवून शिष्यवृत्ती मिळवितात. केमिस्ट्री विभागातील विद्यार्थ्यांनी तर ऐतिहासिक कामगिरी नोंदविल्याचे त्यांनी सांगितले.
प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे वेतन पावणेसहा कोटी
विद्यापीठात १४५ कार्यरत प्राध्यापकांना वेतनापोटी प्रतिमहिना अंदाजे पावणेतीन कोटी रुपये तर ४२१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना सरासरी तीन कोटी रुपये पगार मिळतो. दोघांचा पगार पावणेसहा कोटी रुपयांपर्यंत जातो. मात्र, त्यांच्यापेक्षा अधिकची रक्कम संशोधक विद्यार्थ्यांना मिळत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
विद्यार्थ्यांचा अभिमान....
संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळविणारे विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे. ते खूप मेहनती आणि सक्षम आहेत. विद्यापीठात त्यांना पोषक वातावरण असून, ग्रंथालयात दररोज ५०० ते ६०० विद्यार्थी अभ्यास करतात. ज्ञान मिळविण्यासाठी परिश्रम घेतात. त्या मेहनतीचे शिष्यवृत्ती हे फळ आहे. त्याचा विद्यापीठाला अभिमान आहे.
-डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू
या संस्था देतात संशोधन शिष्यवृत्ती
संस्थेचे नाव.........................................................................विद्यार्थी संख्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (बार्टी).........६८१
राजर्षी शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी)...........४४८
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्याेती).... १७३
राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती.................................................२९३
अनुसूचित जमातीसाठीची राष्ट्रीय शिष्यवृत्ती.............................५२
मौलाना आझाद अल्पसंख्याक विद्यार्थी शिष्यवृत्ती...................१२६
नेट/जेआरएफ.........................................................................१३७
ओबीसी राष्ट्रीय शिष्यवृत्ती.....................................................२८
दिव्यांग शिष्यवृत्ती................................................................१८
पोस्टर डॉक्टरेट, सिनिअर फेलो, कोठारी शिष्यवृत्ती..................१०
एकूण....................................................................................१९६५