मनपात २ कोटींच्या कार्डियाक रुग्णवाहिका शोभेसाठी? गंभीर कर्मचारी खाजगी वाहनाद्वारे रुग्णालयात
By मुजीब देवणीकर | Published: December 21, 2023 02:24 PM2023-12-21T14:24:33+5:302023-12-21T14:25:24+5:30
महापालिकेच्या करमूल्य निर्धारण विभागातील वरिष्ठ लिपिक हे सायंकाळी ५ वाजता अचानक बेशुद्ध पडले.
छत्रपती संभाजीनगर : महापालिका मुख्यालयात बुधवारी सायंकाळी दोन कर्मचारी अचानक अत्यवस्थ झाले. त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यासाठी प्रांगणात २ कोटींच्या कार्डियाक ॲम्ब्युलन्स उभ्या होत्या. मात्र, चालक नसल्यामुळे एका गंभीर कर्मचाऱ्याला चक्क खाजगी वाहनाद्वारे रुग्णालयात न्यावे लागले. विशेष बाब म्हणजे दोन्ही ॲम्ब्युलन्स कोरोना संसर्गात कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही ठराविक रकमा कापून घेतल्या आहेत. याच ॲम्ब्युलन्स वेळेवर उपलब्ध न झाल्याने कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला.
महापालिकेच्या करमूल्य निर्धारण विभागातील वरिष्ठ लिपिक तौसिफ कुरैशी हे सायंकाळी ५ वाजता अचानक बेशुद्ध पडले. त्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. मुख्यालयाच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांना बोलावण्यात आले. काही जण ॲम्ब्युलन्स चालकाचा शोध घेऊ लागले. मग खाजगी वाहन आणण्यात आले. रुग्णालयात नेताना त्यांचा रक्तदाब, पल्सरेट योग्य होता, असे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना राणे यांनी सांगितले. रुग्णालयात त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरी घटना म्हणजे बन्सीलालनगर आरोग्य केंद्रातील लिपिक जयश्री जोशी मुख्यालयात कामानिमित्त आल्या होत्या. त्याही अचानक चक्कर येऊन कोसळल्या. त्यांना पाणी पाजण्यात आले. त्यांना रुग्णालयात नेण्याची गरज नाही, त्या चांगल्या असल्याचे डॉ. राणे यांनी सांगितले. रुग्णवाहिका का उपलब्ध झाली नाही, या प्रश्नावर त्यांनी ‘माहिती घेते’ असे सांगितले.