वर्षाला २ कोटी खर्च तरीही विद्यापीठात सुरक्षेचे तीनतेरा; ना प्रशासन गंभीर ना सुरक्षारक्षक
By राम शिनगारे | Published: February 13, 2024 01:31 PM2024-02-13T13:31:04+5:302024-02-13T13:31:28+5:30
विद्यापीठात सुरक्षेसाठी प्रतिमहिना १५ ते २० लाख रुपये खर्च विद्यापीठ करते आहे. तरीही सुरक्षा रामभरोसे आहे.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी विद्यापीठ प्रशासन प्रतिवर्षी २ कोटी रुपये खर्च करते. प्रत्येक दिवशी तीन शिफ्टमध्ये ७५ सुरक्षारक्षक तैनात असले तरी मागील काही महिन्यांपासून विद्यापीठाच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहे. परिसरात विद्यार्थिनींची छेड काढली जात असताना, तेथील सुरक्षारक्षकाने प्रशासनाला साधी माहितीही दिली नसल्याचे समोर आले.
विद्यापीठात सुरक्षेसाठी प्रतिमहिना १५ ते २० लाख रुपये खर्च विद्यापीठ करते आहे. तरीही सुरक्षा रामभरोसे आहे. काही महिन्यांपूर्वी एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने विद्यापीठातील विविध इमारती, बोर्डांवर संघटनेची नावे लिहून विद्रुपीकरण केले होते. तेव्हाही सुरक्षारक्षकांनी कोणाला अडवले नाही. तत्पूर्वी, एका विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणातून परिसरात जाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्या घटनेत काहीही कारवाई न झाल्यामुळे त्याच विद्यार्थ्याने शासकीय विज्ञान संस्थेत विद्यार्थिनीला पेटवून स्वत:ही जाळून घेतले. त्याशिवाय विद्यापीठातून अनेक वेळा चोरीचा प्रयत्न झाला आहे. सुरक्षा व्यवस्था चोख करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन कोणतेही पाऊल उचलत नसल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांमधून समोर आले आहे.
घटनेनंतरही आढावा नाहीच
विद्यापीठ परिसरात गुरुवारी रात्री ८ वाजता विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्यानंतर कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी अद्यापही आढावा घेतला नसल्याचीही माहिती समोर आली आहे.
पीडित विद्यार्थिनी ग्रामीण भागातील
वाय पॉइंट परिसरात छेड व अपहरणाचा प्रयत्न झालेल्या विद्यार्थिनी परभणी, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील असून, त्या दहावीनंतर शिक्षणासाठी नायलेट संस्थेत आल्या आहेत. घटनेची माहिती घरी समजल्यास शिक्षणापासून वंचित राहावे लागेल, अशी भीतीही विद्यार्थिनींनी बोलून दाखवली.
पोलिसांच्या अहवालाची अंमलबजावणी नाहीच
संशोधक विद्यार्थ्यांच्या जळीत कांडानंतर शहर पोलिसांनी विद्यापीठातील सुरक्षायंत्रणेवरच्या त्रुटींवर बोट ठेवले होते. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. सुरक्षारक्षक तत्काळ माहिती देत नाहीत. प्रशासन सुरक्षेवर गंभीर नसल्याचेही ताशेरे पोलिसांनी ओढले होते.