मृत, बोगस नावांचा वापर करत रोहयो कामात २ कोटींचा अपहार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 05:37 AM2019-05-06T05:37:51+5:302019-05-06T05:38:23+5:30
झरी -वडगाव येथे २०१० -२०१३ या काळात संगनमत करून रोहयोअंतर्गत विविध कामे न करता बोगस मजूर दाखवून दीड ते दोन कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार, बीडीओ, तालुका कृषी अधिकारी, शाखा अभियंता, सरपंच, ग्रामसेवक, पोस्टमास्तर, पोस्टमन अशा एकूण १६ जणांविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
खुलताबाद (जि. औरंगाबाद) : झरी -वडगाव येथे २०१० -२०१३ या काळात संगनमत करून रोहयोअंतर्गत विविध कामे न करता बोगस मजूर दाखवून दीड ते दोन कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार, बीडीओ, तालुका कृषी अधिकारी, शाखा अभियंता, सरपंच, ग्रामसेवक, पोस्टमास्तर, पोस्टमन अशा एकूण १६ जणांविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
झरी-वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीत रोहयोअंतर्गत ग्रामसुधार, स्वच्छता, पाणी पुरवठा व सिंचन विभागाने विविध काम कामे केली. संगनमताने कामे बोगस मजूर दाखवून दीड ते दोन कोटी रूपयांचा अपहार झाल्याची तक्रार गोवर्धन सुदामसिंग चंदवाडे यांनी वरिष्ठ अधिकारी व पोलिसांत केली होती. परंतु सदरील प्रकरणात गुन्हा दाखल होत नसल्याने गोवर्धन चंदवाडे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशाने १६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्कालीन सरपंच रेखाबाई ज्ञानेश्वर राऊत, सरपंच पती ज्ञानेश्वर विठ्ठल राऊत, तत्कालीन ग्रामसेवक आर. बी. गुुंजाळ, ग्रामरोजगार सेवक कल्याण महासिंग महेर, तत्कालीन पोस्टमन अशोक उत्तम गायकवाड, पोस्टमास्तर रमेश पांडुरंग सोनवणे, तत्कालीन तहसीलदार अनिता भालेराव, तत्कालीन पेशकार व वनपाल तसेच तत्कालीन कृषीसेवक व्ही. एच. पाटील, जि.प.सिंचनचे शाखा अभियंता राजेंद्र मधुकर अमृतकर, तत्कालीन गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, ठेकेदार काकासाहेब काशिनाथ लोंढे व सुभाष ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
मतदार ६०० अन् बोगस जॉबकार्ड १,३६८
झरी -वडगाव येथे मनरेगा अंतर्गत संगनमत करून शासकीय निधीचा अपहार करण्यासाठी संबधितांनी बोगस जॉबकार्ड बनविले. त्यात मृत, लोकांची काल्पनिक नावे, अपंग, अल्पवयीन व्यक्ती, बाहेरगावी राहणारे, वयोवृद्ध आदींच्या नावे अनेक जॉबकार्ड बनविले. गावाची मतदारसंख्या ६०० असताना १३६८ खोटे व बनावट जॉबकार्ड तयार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.