म्हणे २ दिवसांआड; ५ दिवसांआडही पाणी मिळेना; छत्रपती संभाजीनगरात सर्वसामान्य प्रचंड त्रस्त
By मुजीब देवणीकर | Published: April 15, 2024 11:48 AM2024-04-15T11:48:38+5:302024-04-15T11:50:57+5:30
शहरात कुठे कुठे सहाव्या, तर कुठे बाराव्या दिवशी पाणीपुरवठा
छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणात १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा उन्हाळ्यात पुरेल, यापेक्षा कितीतरी जास्त पाणी धरणात असतानाही महापालिकेची जास्त पाणी आणण्याची क्षमताच नाही. २०० कोटी रुपये खर्च करून ९०० मिमी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली. त्यानंतरही शहरात वाढीव ७५ एमएलडी पाणी आणणे अशक्य झाले आहे. २० फेब्रुवारीपासून शहराला दोन दिवसांआड पाणी मिळेल, अशी घोषणा मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केली होती. ही घोषणा आता हवेत विरली. खंडपीठात पाच दिवसांआड शहराला पाणी देऊ, हे आश्वासनही खोटे ठरले. शहराला कुठे सहाव्या, तर कुठे बाराव्या दिवशी पाणी मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन करण्याची गरज पडू नये म्हणून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी. व्यासाची जलवाहिनी टाकली. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात अतिरिक्त ७५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमताच नाही. आता याच ठिकाणी नवीन जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी सुरू आहे. हे काम जून किंवा जुलैमध्ये पूर्ण होईल. मनपाकडे पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्याने शहराला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
जायकवाडी धरण आणि हर्सूल तलावातून दररोज १४० ते १४२ एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. प्रत्यक्षात शहरात १२० एमएलडी पाणी येत आहे. तब्बल २० एमएलडी पाणी शहरात दाखल होण्यापूर्वीच वाहून जात आहे. केवळ जलवाहिन्यांवरील गळत्यांमुळेच शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान अनेक ठिकाणी जलवाहिनीतून पाण्याची गळती सुरू असते. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे.
मनपाला पाहिजे निमित्त
आरेफ कॉलनीसारख्या वसाहतीला १२व्या दिवशी पाणीपुरवठा होतो. सिडको - हडकोतही सर्वाधिक पाणीटंचाईचा त्रास आहे. भावसिंगपुरा, शहागंज, जिन्सी, पुंडलिकनगर, रेल्वे स्टेशन, पैठण गेट, सिटी चौक, धावणी मोहल्ला इ. वसाहतींना ठरलेल्या दिवशी पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. जलवाहिनी फुटल्याचे, वीजपुरवठा खंडित झाल्याची कारणे मनपाकडून सांगण्यात येतात.