उड्डाणपुलावर २ मित्रांना जीपने उडवले; एकाचा जागीच मृत्यू, एकजण ३० फूट खाली कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 01:13 PM2024-10-07T13:13:55+5:302024-10-07T13:16:19+5:30
उड्डाणपुलावर दोन मित्रांना चारचाकीवाल्याने उडवले; एक जण हवेत उडून ३० फूट खाली कोसळला
छत्रपती संभाजीनगर : भरधाव स्काॅर्पिओने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील एक तरुण हवेत उडाला आणि उड्डाणपुलावरून थेट ३० फूट खाली रस्त्यावर कोसळला. या भीषण अपघातात दुचाकीस्वार दोन्ही तरुण ठार झाले. रेल्वे स्टेशन उड्डाणपुलावर ६ ऑक्टोबरला मध्यरात्री १:३० वाजता हा अपघात झाला. याप्रकरणी स्काॅर्पिओचालक आणि पाइपलाइनचे काम करणाऱ्या ठेकेदार जीव्हीपीआर कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत फिलीप पाखरे (रा. पीडब्ल्यूडी शासकीय निवासस्थान, पदमपुरा) आणि राहुल लखपतसिंग लोदी (रा. केशरसिंगपुरा, कोकणवाडी) अशी मृतांची नावे आहेत. ते दोघेही चांगले मित्र होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महानुभाव चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर जीव्हीपीआर कंपनीकडून पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनचे काम सुरू आहे. त्यासाठी कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता, तसेच दिशादर्शक फलक न लावता त्या बाजूचा रस्ता बंद करून वाहतूक रॉंग साइडने वळविली होती. त्या रस्त्यावरून स्काॅर्पिओ (एमएच ०६, एएन ८०७६) रेल्वे स्टेशनकडे जात होती. त्याचवेळी दुचाकीस्वार ( एमएच २०, एफके ०४८२) हेमंत आणि राहुल हे दोघे मित्र महानुभाव चौकाकडे येत होते. राँग साइड जाणाऱ्या स्काॅर्पिओने उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली.
ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील राहुल लोदी हा हवेत उंच फेकला गेला. तो उड्डाणपुलावरून थेट ३० फूट खाली रेल्वे पटरीच्या बाजूला रस्त्यावर कोसळला. त्याच्या छाती आणि पायाला गंभीर मार लागला. एवढ्या उंचीवरून कोसळेल्या राहुलचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुचाकीवरील दुसरा तरुण हेमंत जागीच ठार झाला. अपघात होताच स्कार्पिओ चालक गाडी सोडून पसार झाला आहे. दरम्यान, अपघात झाला तेव्हा राहुलचा चुलत भाऊ बॉबी लोदी हा मित्रासोबत चहा पिण्यासाठी जय टॉवर येथून सिल्कमिल कॉलनीकडे गेला होता. तेथून परतत असतानाच हा अपघात झाला. त्या दोघांनीच नातेवाइकांसह पोलिसांना घटनेची माहिती दिली.