पाणीपुरवठ्याची २ तास वीज गुल; पुन्हा एक दिवसाने टप्पा वाढला
By मुजीब देवणीकर | Published: September 13, 2023 02:55 PM2023-09-13T14:55:46+5:302023-09-13T14:56:22+5:30
पोळा, गौरी-गणपतीच्या तोंडावर पाणीपुरवठ्याची वीज गुल
छत्रपती संभाजीनगर : पोळा, गौरी-गणपतीचा सण तोंडावर असताना शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत झाला आहे. मंगळवारी दुपारी ३:१५ ते सायंकाळी ५:४५ पर्यंत फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. रात्री ९ वाजेनंतर ज्या वसाहतींना पाणीपुरवठा करण्यात येणार होता, ते टप्पे एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतल्याचे कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी सांगितले.
१५ सप्टेंबरपासून शहरात मराठवाडा मुक्तिसंग्राम महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. राज्याचे मंत्रिमंडळ, केंद्रीय गृहमंत्री आदी व्हीव्हीआयपी मंडळी शहरात थांबणार आहेत. त्यातच १६ रोजी मंत्रिमंडळ बैठक होत असून, मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांतील पक्ष, संघटनांचे मोर्चेसुद्धा शहरात आहेत. अशा परिस्थितीत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मनपाची कसरत सुरू असतानाच मंगळवारी नवीन विघ्न आले. फारोळा जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा अडीच तास बंद होता. त्यामुळे फारोळा आणि जायकवाडी येथील दोन्ही योजनेचे पंप बंद पडले. सायंकाळी ६ वाजता शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर जलकुंभ भरण्यास सुरुवात झाली.
काय म्हणाले अधिकारी?
कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी नमूद केले की, वीजपुरवठा खंडित झाल्याने सिडको-हडकोसह जुन्या शहरातील अनेक वसाहतींना पाणीपुरवठा झाला नाही. जलकुंभ भरल्याशिवाय पाणी देता येत नाही. रात्री ९ वाजेपर्यंतचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्यात येतील. बुधवारी पाणीपुरवठा करताना मंगळवारचे टप्पे पूर्ण केले जातील.
मोठा धक्का लागला तरी....
शहराची तहान भागविणाऱ्या ७०० आणि १४०० मिमी व्यासाच्या दोन्ही जलवाहिन्या अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. मोठा धक्का लागला तरी जलवाहिन्या फुटतात. या दोन्ही जलवाहिन्यांच्या बाजूने सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ९०० आणि २५०० मिमी व्यासाच्या दोन जलवाहिन्या शहरासाठी टाकण्यात येत आहेत. काम करताना वारंवार जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार वाढत असल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतोय.
९०० मिमीचे काम पूर्ण करणे गरजेचे
नवीन पाणीपुरवठा योजनेत २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला विलंब होतोय. त्यामुळे युद्धपातळीवर ९०० मिमी व्यासाची आणखी एक जलवाहिनी टाकणे सुरू आहे. हे काम त्वरित पूर्ण झाले तर शहराला दररोज अतिरिक्त ८० एमएलडी पाणी मिळेल. या कामासाठी पाठपुरावा कमी पडतोय.
पाणीपुरवठ्यातील अडचणींचा डोंगर
२० जुलै -१४०० मिमी व्यासाच्या पाणीपुरवठा योजनेत बिघाड.
२२ जुलै - ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला रेल्वेस्टेशनजवळ लिकेज.
४ ऑगस्ट- जायकवाडीत दुरुस्तीसाठी मनपाने घेतला मोठा शटडाऊन.
५ ऑगस्ट- जायकवाडीत ट्रान्सफाॅर्मर जळाला. बसविताना दुसराही जळाला.
७ ऑगस्ट- ट्रान्सफाॅर्मर बदलण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा काही तास बंद.
२८ ऑगस्ट- जायकवाडी वसाहतीजवळ काम करताना जलवाहिनी फुटली.
४ सप्टेंबर- गेवराई तांडा येथे नवीन जलवाहिनी टाकताना मोठी जलवाहिनी फुटली.
१२ सप्टेंबर-फारोळा जलशुद्धीकरणात अडीच तास वीजपुरवठा खंडित.