पुसेगावात २ लाख ४५ हजारांचा गुटखा जप्त
By Admin | Published: July 5, 2017 11:37 PM2017-07-05T23:37:03+5:302017-07-05T23:39:24+5:30
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे राजरोसपणे गुटख्याची विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे २ लाख ४५ हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे राजरोसपणे गुटख्याची विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे २ लाख ४५ हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा भवानी देवी शिवारातील महादू कापसे यांच्या शेताजवळील टेकडीच्या ओढ्यात वाहतूक शाखेचे सपोनि बंदखडके यांच्या पथकाने ५ जुलै रोजी पकडला. तर मुद्देमाल नर्सी नामदेव पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. यामुळे गुटखामाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मागील अनेक वर्षांपासून अवैध गुटखा विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली होती. सेनगाव हे अवैध गुटखा विक्रीचे मुख्य केंद्रस्थान असून येथील अवैध गुटखामाफियांकडून संपूर्ण तालुक्यात द्वारपोच गुटखा पाठविला जातो. पुसेगाव येथे चंद्रकांत महादेवआप्पा कावरे हे अवैध गुटखा विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सपोनि बंदखडके, पोकॉ बालाजी बोके, आनंद मस्के या पथकाने छापा मारला. चंद्रकांत महादेवअप्पा कावरे (रा. सेनगाव) हे जीप क्र. एम. एच. २६ व्ही. १९९३ या वाहनाने अवैध गुटखा वाहतूक करीत होते. पुसेगाव शिवारातील महादू कापसे यांच्या शेताजवळील टेकडीच्या नाल्यात बंदखडके यांच्या पथकाने कार्यवाही करून २ लाख ४५ हजारांचा अवैध गुटखा व टाटा सुमो वाहन जप्त केले. हा मुद्देमाल नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात देण्यात आला.
पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला बोलावण्यात आल्याची माहिती नर्सी ठाण्याचे सपोनि बालाजी येवते यांनी दिली. त्यामुळे अजून या प्रकरणात गुन्हा दाखल होणे बाकी आहे.