घरफोड्या करणाऱ्या चोरट्याकडून २ लाख ७५ हजारांचे दागिने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:04 AM2020-12-26T04:04:52+5:302020-12-26T04:04:52+5:30
औरंगाबाद : सिडकोमधील दोन घरे फोडणाऱ्या चोरट्याला सिडको पोलिसांनी अटक केली. घरफोडी करून चोरलेल्या दागिन्यांपैकी सुमारे पावणेतीन लाखांचे सोन्याचे ...
औरंगाबाद : सिडकोमधील दोन घरे फोडणाऱ्या चोरट्याला सिडको पोलिसांनी अटक केली. घरफोडी करून चोरलेल्या दागिन्यांपैकी सुमारे पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले. गणेश जनार्दन अडागळे (२९, रा. मुरलीधरनगर, उस्मानपुरा) असे आरोपीचे नाव आहे.
याविषयी सिडको पोलिसांनी सांगितले की, मंगळसूत्र चोरी, घरफोडी आणि दुचाकी चोरी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके, हवालदार नरसिंग पवार, सुभाष शेवाळे, भिसे, स्वप्नील रत्नपारखी आणि विशाल सोनवणे हे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली २४ डिसेंबर रोजी गस्तीवर होते. तेव्हा टीव्ही सेंटर येथे एका सोनाराच्या दुकानाजवळ चोरीचे सोने विक्री करण्यासाठी एक जण आल्याची माहिती खबऱ्याने त्यांना दिली. पोलिसांनी लगेच तेथे धाव घेतली असता साध्या वेशातील पोलीस त्याच्याकडे जात असताना तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर त्याला पकडले. पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये सोन्याचे दोन कर्णफुले आढळून आली. या दागिन्याविषयी त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर त्याने सहा महिन्यांपूर्वी सिडकोतील अयोध्यानगर येथील घर फोडून चोरलेले हे दागिने असल्याचे सांगितले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत जुलै महिन्यात म्हाडाचे अधिकारी रमेश शंकराव बर्फे यांची घरफोडीची घटना नोंद असल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता घरामध्ये सोन्याची पोत आढळून आली. पोत त्याने सुदर्शननगर येथील घरातून चोरी केल्याचे सांगितले. राजूबाई ज्ञानदेव डोंगरे यांचे घर ऑक्टोबर महिन्यात त्याने फोडल्याचे निष्पन्न झाले. चोरलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने त्याने एका सोन्या-चांदीच्या दुकानात विक्री केले होते. पोलिसांनी दुकानदाराकडून चोरीचे सोने जप्त केले. आतापर्यंत पावणेतीन लाखांचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.(फोटोसह)