२ खासदार आणि ३ आमदाराच्या फर्दापूरला १२ महिने कोरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 08:13 PM2018-04-30T20:13:52+5:302018-04-30T20:18:08+5:30
गेल्या ३० वर्षांपासून या गावची नळयोजना बंद असून बाराही महिने पाणीटंचाईच्या झळा सोसणारे हे राज्यातील कदाचित एकमेव गाव असावे.
- उदयकुमार जैन
औरंगाबाद : जगप्रसिध्द अजिंठा लेणीमुळे जगाच्या नकाशावर नाव कोरले गेलेल्या सोयगाव तालुक्यातील ऐतिहासिक फर्दापूर गावाची शोकांतिका विदारक आहे. गेल्या ३० वर्षांपासून या गावची नळयोजना बंद असून बाराही महिने पाणीटंचाईच्या झळा सोसणारे हे राज्यातील कदाचित एकमेव गाव असावे. ६-७ हजार लोकसंख्येच्या अख्ख्या गावाला दररोज विकतचे पाणी घेऊन गुजराण करावी लागते. यामुळे खाजगी पाणी विक्रीच्या धंद्याला येथे सुगीचे दिवस आले आहेत. एवढी वर्षे उलटूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाग आलेली नाही, हे विशेष. गरीब लोकांकडे पैसे नसल्याने ते विकतचे पाणी घेऊ शकत नसल्याने त्यांची मात्र वणवण भटकंती पाहून डोळ्यात पाणी आले नाही तर नवलच.
औरंगाबाद -जळगाव महामार्गावरील हे तालुक्यातील मोठे गाव असून अजिंठा लेणीइतकेच या गावाला महत्त्व आहे. परंतु ३० वर्षांपूर्वी गावातील पुढाऱ्यांच्या व ग्रामपंचायतीच्या उदासिनतेमुळे बंद पडलेली नळयोजना आता कालबाह्य झाल्याने ती आता सुरु होणे शक्य नाही. यासाठी नवीनच योजना कार्यान्वित करावी लागणार आहे. मात्र यासाठी कोण प्रयत्न करणार, असाही प्रश्न आहे.
नेत्यांच्या बाबतीत ‘भाग्यवान’ तालुका
सोयगाव तालुक्याची विभागणी जालना, औरंगाबाद या दोन लोकसभा मतदारसंघात व सिल्लोड, भोकरदन, कन्नड या तीन विधानसभा मतदारसंघात झालेली आहे. त्यामुळे या ‘भाग्यवान’ तालुक्याला दोन खासदार व तीन आमदार लाभलेले आहेत. याशिवाय स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणाऱ्यांचीही तालुक्यात ‘भरमार’ आहे. परंतु अजूनही या गंभीर समस्येकडे कुणी पोटतिडकीने बघितलेले नसल्याने फर्दापूरकरांची होरपळ दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच अजिंठा लेणीमुळे ‘गल्ली ते दिल्ली’पर्यंतच्या नेत्यांसह अधिकाऱ्यांचा येथे नेहमी वावर असतो. अनेकदा गावकरी आशेपोटी त्यांच्याकडे पाण्याची समस्या मांडतात, परंतु आजपर्यंत आश्वासनापलीकडे काहीही मिळालेले नाही. आहे त्या दोन खासदारांपैकी कुणीतरी ‘दान’त दाखवावी किंवा आश्वासनांची ‘खैरात’ न करता प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी गावकऱ्यांना अपेक्षा आहे.
विदेशी पर्यटकांकडून ‘पाणीबाणी’चे चित्रीकरण
पाणी घेण्यासाठी ग्रामस्थांची होणारी जीवघेणी कसरत पाहून दररोज गावात येणारे विदेशी पर्यटक मोठ्या हौशीने ही दृश्ये आपल्या कॅमेऱ्यात टिपतात व सहानूभूतीपूर्वक पाणीटंचाईविषयी गावकऱ्यांशी चर्चाही करतात.
खाजगी टँकरचा आधार
गावात नऊ ते दहा खाजगी टँकर सुरू असून पैसे घेऊन का होईना; ते गावाची तहान भागवतात. प्रति टाकीसाठी ४० ते ५० रुपये मोजावे लागतात.
सर्व प्रयत्न करुन गावकरी थकले पाण्यासाठी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थ व महिलांनी अनेक आंदोलने केली, संबंधितांना निवेदने दिली, पण उपयोग झालेला नाही. हातपंप व सार्वजनिक विहिरींची अवस्थाही बिकट आहे. शासकीय टँकरचे दर्शनही होत नाही. ग्रामपंचायत प्रयत्न करुन थकली आहे. पाणीयोजना मंजूर झाली, लवकरच येणार अशा लोकप्रतिनिधींच्या वारंवारच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. ढिम्म प्रशासन व लोकप्रतिनिधींना ३० वर्षांत पाण्याचा ‘धर्म’ पाळता आलेला नाही, याशिवाय मोठी शोकांतिका काय असू शकेल?
प्रस्ताव पाठवून महिना झाला
एक महिन्यापूर्वी टँकरचा प्रस्ताव पाठविला आहे. अजूनही टँकर आले नाही. आम्ही विहिरी अधिग्रहण केलेल्या आहेत परंतु शासनाने टँकर पाठविला नाही. शासनाने फदार्पूरच्या पाणीपुरवठ्यासाठी कायमस्वरुपी नियोजन करावे.
- रेणुका आगळे, सरपंच फर्दापूर
प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत
सोयगाव तालुक्यात पाच गावांच्या उपाययोजनेसाठी टँकरचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. परंतु पंधरा दिवसांपासून फर्दापूर, उमरविहीरे, वाकडी या तीन गावांचे प्रस्ताव सिल्लोडला पडून आहे. यातील अडचणी अद्यापही तालुका प्रशासनाला कळविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे फदार्पूरला पाण्याचे टँकर सुरु होण्यासाठी विलंब होत आहे.
- छाया पवार, तहसीलदार, सोयगाव
वरिष्ठ पातळीवर अडचण आहे
पाणीटंचाईच्या झळा मार्च महिन्यातच गंभीर झाल्या होत्या. त्यासाठी शासनाच्या निकषाला अधीन राहून प्रस्ताव पाठविले आहे. परंतु वरिष्ठ पातळीवरून भूवैज्ञानिकाचे कारण पुढे करत टँकरचे प्रस्ताव मंजूर केलेले नाहीत. त्यामुळे सोयगाव तालुक्यातील टँकरच्या प्रस्तावाचा प्रश्न जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनुत्तरीत आहे.
- प्रकाश जोंधळे, गटविकास अधिकारी, सोयगाव