भोकरदन तालुक्यात वाळूमाफियाकडून दोन तलाठ्यांचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:44 AM2017-09-25T00:44:27+5:302017-09-25T00:44:27+5:30
वाळूमाफियांनी या आदेशाला ठेंगा दाखवत चक्क दोन तलाठ्यांचे अपहरण केल्याची घटना भोकरदन तालुक्यात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाईच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाला २४ तास उलटत नाहीत. तोच वाळूमाफियांनी या आदेशाला ठेंगा दाखवत चक्क दोन तलाठ्यांचे अपहरण केल्याची घटना भोकरदन तालुक्यात घडली. या घटनेवरुन अवैध धंद्यांवर पोलिसांसह राज्य सरकारचा अंकुश राहिला नसल्याचे या घटनेवरुन दिसून येते. जप्त केलेले वाळूचे टिप्पर राजूर येथून तहसीलमध्ये घेऊन जाणाºया दोन तलाठ्यांचे वाळूमाफियाने अपहरण केले. तलाठ्यांना धावत्या वाहनातून ढकलून देण्याचाही प्रयत्न केला. रविवारी सकाळी आठच्या सुमारास बरंजळा ठोंबरे ते जवखेडा ठोंबरे दरम्यान पंधरा किलोमीटर हा थरार सुरू होता. पोलीस व महसूल पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने ट्रक अडवून तलाठ्यांची सुटका केली.
तहसीलदार संगीता कोल्हे यांच्या पथकाने रविवारी सकाळी सातच्या सुमारास अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली. यात राजूर चौफुलीवर त्यांनी एका टिप्परला (एमएच. २०, बीटी. १९२५ ) तीन ब्रास अवैध वाळूची वाहतूक करताना पकडले. तहसीलदारांच्या सूचनेवरून चालक संतोष शिंदेला घेऊन तलाठी भागवत जाधव व रामेश्वर कांबळे हे जप्त केलला टिप्पर घेऊन भोकरदन तहसीलकडे निघाले. अचानक एका जीपने टिप्परचा रस्ता अडवला व त्यामधून आलेल्या चालक सर्जेराव चव्हाण (रा. मानदेऊळगाव ता. बदनापूर ) याने दोन्ही तलाठ्यांना जिवे मारण्याची धमकी देत उतरण्यास सांगितले. तलाठी धमकीला न जुमानता टिपरमध्येच बसून राहिले. यामुळे संतापलेल्या त्या व्यक्तीने चालकाला खाली उतरवत टिपरचा ताबा घेतला. भरधाव टिप्पर बरंजळा रोडवर नेला.तहसीलदार संगीता कोल्हे यांचे पथक टिप्परचा पाठलाग करत होते. कोल्हे यांनी माहिती हसनबाद ठाण्याचे स. निरीक्षक किरण बिडवे यांना दिली. पथकाने टिप्परचा पंधरा किलोमीटर पाठलाग केला. भरधाव टिप्परने जवखेडा ठोंबरे या गावाजवळ एका दुचाकीस्वारास हूल दिली, पुढे एका मुलीला व बैलगाडीला उडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दोन्ही तलाठ्यांनी मोबाईलवरून तहसीलदार कोल्हे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्यांना शिवीगाळ करत, मी टिपर खड्ड्यात घालून उडी मारेल, तुम्हाला, तहसीलदारांनाही जिवे मारेल अशी धमकी दिली. यासोबतच त्यांना टिपर मधून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघांनी प्रसंगावधान राखत जीव वाचवला. दरम्यान, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, बबनराव लोणीकर व अर्जुन खोतकर यांनी शनिवारीच कायदा सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेतली होती.