पीकविम्याचे ३६ शाखातील २० कोटी येणे बाकी
By Admin | Published: July 19, 2015 12:26 AM2015-07-19T00:26:15+5:302015-07-19T00:26:15+5:30
शिरीष शिंदे , बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरलेल्या पीकविम्यापोटी ३३६ कोटी ६३ लाख रुपयांचा विमा मंजूर झालेला आहे. त्यातील ३६ शाखेतील २० कोटी रुपये येणे बाकी असल्याची माहिती
शिरीष शिंदे , बीड
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरलेल्या पीकविम्यापोटी ३३६ कोटी ६३ लाख रुपयांचा विमा मंजूर झालेला आहे. त्यातील ३६ शाखेतील २० कोटी रुपये येणे बाकी असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक अधिकारी गंगाधर बोकाडे यांनी दिली.
खरीप हंगामासाठी ३३६ कोटी ६३ लाख ९१ हजार रुपये पीकविमा मंजूर झाला होता. स्टेट बँक आॅफ इंडियांच्या १३ शाखांमध्ये १९ हजार ६६६ शेतकऱ्यांनी भरलेल्या पीकविमा वाटपाची यादी तयार करण्यात आली असून, २९ कोटी ३२ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. ग्रामीण बँकेसाठी ३१ कोटी १० लाख रुपये पीकविमा रक्कम मिळाली असून तेथील शेतकरी संख्या ६५ हजार ४९० आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ४ लाख ६९ हजार ३५२ शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला असून २५१ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. सेंट्रल बँक आॅफ इंडिया सिरसमार्ग शाखेसाठी ९९ लाख ६१ हजार रुपये पीकविमा रक्कम मिळाली असून, शेतकरी सभासद १३ हजार आहेत. या बँकेतील शेतकऱ्यांची यादी अद्याप आलेली नसल्याचे बँक अधिकारी बोकाडे यांनी सांगितले.
स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या १७ शाखांसाठी १३ कोटी १२ लाख ६३ हजार रुपये पीकविम्यापोटी मिळाले आहेत. त्यापैकी घाटनांदूर, नागापूर शाखेला ४ कोटी ७० लाख रुपये प्राप्त झाले आहेत मात्र, अद्याप यादी आली नसल्याचे बँक अधिकारी बोकाडे यांनी सांगितले.
पीकविम्याची रक्कम इन्शुरन्स कंपनीकडून दिली जाते. मात्र, अद्याप जिल्ह्यातील ३६ बँकेच्या शाखेतील पीकविम्याची २० कोटी रुपयांची रक्कम अद्याप प्राप्त झाली नसल्याचे बँक अधिकारी बोकाडे म्हणाले.
दरम्यान, पीकविम्याची रक्कम मिळावी यासाठी शेतकरी वारंवार चकरा मारीत आहेत. परंतु त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने आतापर्यंत ४० कोटी पीकविमा रक्कम वाटप केली आहे. ग्रामीण बँकेने ३० कोटी रुपये वाटले आहेत. ग्रामीण बँकेच्या काही शाखांमध्ये शेतकऱ्यांचे खाते क्रमांक जुळत नसल्याच्या तक्रारी आहेत.