एसटी कर्मचाऱ्यांना २० दिवस सक्तीची रजा; अंमलबजावणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 07:31 PM2020-07-13T19:31:36+5:302020-07-13T19:33:52+5:30
कोरोनामुळे केवळ ग्रामीण भागात एसटी सेवा सुरू आहे; परंतु सुरू असलेल्या बसला फारसा प्रतिसाद नाही.
औरंगाबाद : कोरोना संकटामुळे तोट्यात आलेल्या एसटीने जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना २०-२० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यास सुरुवात केली आहे.
औरंगाबाद विभागात म्हणजे जिल्ह्यात एसटी महामंडळाचे एकूण ३ हजार कर्मचारी आहेत. यात शिपायापासून लिपिक, वाहनचालक, वाहक, यांत्रिकी विभागातील कामगारांचा समावेश होतो. या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत आहे. कोरोनामुळे केवळ ग्रामीण भागात एसटी सेवा सुरू आहे; परंतु सुरू असलेल्या बसला फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे तोटा वाढत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब होत आहे. यावर पर्याय म्हणून मालवाहतूक सुरू केली. त्याला प्रतिसाद मिळत आहे. असे असताना जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना २०-२० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश दिला आहे. एसटी महामंडळाच्या परिपत्रकानुसार रजेवर पाठविण्यात येत असल्याचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.
२० रजा पसंतीनुसार : एसटी कर्मचाऱ्यांना वर्षभरात ४० रजा देण्यात येतात. यातील निम्म्या रजा या मंदीच्या काळात देता येतात, तर उर्वरित २० रजा कर्मचारी पसंतीनुसार घेऊ शकतात. सध्या मंदीचा काळ असल्याने रजेवर पाठविणे क्रमप्राप्त असल्याचे मध्यवर्ती बसस्थानक आगार व्यवस्थापकांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.
रविवारपासून पाठविले रजेवर : मध्यवर्ती बसस्थानकातील २० कर्मचाऱ्यांना रविवारपासून रजेवर पाठविण्यात आले. अशाच प्रकारे प्रत्येक आगारात कर्मचाऱ्यांना रजेवर पाठविण्यात येत आहे. २० दिवस कापण्यात येणारी रजा ही अर्जित रजा असल्याने त्याचे वेतन एसटीला द्यावे लागणार आहे, असे असेल तर मग रजा कपात करण्याचा उद्देश काय, असा प्रश्न कामगार विचारत आहेत.