२० मोकाट कुत्र्यांचा वासरावर हल्ला;अवघ्या तीन मिनिटांत वासरू गतप्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 05:24 PM2019-08-31T17:24:49+5:302019-08-31T17:26:50+5:30
कुत्र्यांचा पुजाऱ्यावरही हल्ला
औरंगाबाद : मोकाट कुत्र्यांनी अवघे शहर त्रस्त झालेले असतानाही महापालिका कुंभकर्णी झोपेतून जागे होण्यास तयार नाही. गुरुवारी पोलिसांनी बोलावलेल्या शांतता समितीच्या बैठकीत मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गाजला. त्यापाठोपाठ शुक्रवारी पहाटे ५ वाजता शाहगंज भाजीमंडई येथील महादेव-मारुती मंदिरातील पूजा सुरू असताना मोकाट कुत्र्यांनी अवघ्या तीन मिनिटांमध्ये वासराचा जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात कुत्र्यांची प्रचंड दहशत पसरली आहे.
महादेव-मारुती मंदिरात छोटीशी गोशाळा असून यात पाच गायी आहेत. यात एका गायीचे एक महिन्याचे वासरूही होते. नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजता चंद्रकांत इंगळे, मंदा इंगळे यांनी साफसफाई करून देवपूजा सुरू केली. इंगळे दाम्पत्य देवपूजेमध्ये व्यस्त असताना मंडईतील २० कुत्र्यांच्या टोळक्याने वासरावर हल्ला केला. यावेळी कुत्र्यांच्या भुंकण्यासह वासराच्या आणि गायींच्या हंबरण्याचा आवाज आला.
इंगळे यांना काही समजण्याच्या आत वासरू या कुत्र्यांच्या तावडीत सापडले. मंदिरात बाहेर जाऊन कुत्र्यांना हाकलेपर्यंत अचानक झालेल्या हल्याने वासरू अर्धमेले झाले होते. येथे पडलेले साहित्य कुत्र्यांना मारून वासराला सोडवण्यासाठी इंगळे दाम्पत्यांनी प्रयत्न केले. मात्र, २० कुत्र्यांपुढे इंगळे यांचा विरोध तोकडा पडला. यावेळी काही कुत्रे इंगळे यांच्यावरही धाऊन जात होते. मात्र, त्यांना न जुमानता इंगळे यांनी कुत्र्यांना पळवून लावत वासरू यांच्या ताब्यातून सोडवले. तोपर्यंत वासराने प्राण सोडले होते. दरम्यान, दुपारी याच मंडईत आईसोबत भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या सात वर्षांच्या मुलालाही त्याच कुत्र्यांनी चावा घेतला.
शहरात ३५ हजार कुत्री
शहरात जवळपास ३५ हजार कुत्री असावीत, असा अंदाज दोन दिवसांपूर्वीच स्थायी समितीच्या बैठकीत डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी व्यक्त केला होता. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली. खाजगी संस्थेच्या सहकार्याने मागील दोन वर्षांपासून नसबंदी सुरू असल्याचा दावा नाईकवाडे यांनी केला.