जि.प.चे २० गुरुजी गायब
By Admin | Published: October 9, 2016 12:46 AM2016-10-09T00:46:09+5:302016-10-09T01:07:47+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे जवळपास वीस शिक्षक गेल्या पाच महिन्यांपासून गायब आहेत. मे महिन्यात झालेल्या सार्वत्रिक बदल्यानंतर ते शिक्षक बदली
औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे जवळपास वीस शिक्षक गेल्या पाच महिन्यांपासून गायब आहेत. मे महिन्यात झालेल्या सार्वत्रिक बदल्यानंतर ते शिक्षक बदली झालेल्या ठिकाणी रुजूच झाले नाहीत. दरम्यान, गेल्या आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड यांनी शाळेवर हजर न होणाऱ्या अशा शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते.
मे महिन्यात शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. तेव्हा गैरसोयीच्या शाळांत बदली झाल्यामुळे काही शिक्षक सोयीच्या शाळांमध्ये पदस्थापना मिळविण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, प्रशासनाने त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे जवळपास २० शिक्षक नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून बदली झालेल्या शाळांत रुजूच झालेले नाहीत. परिणामी, अशा शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी शिक्षण सभापती विनोद तांबे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी शिक्षक देण्याची मागणी केली होती.
यासंदर्भात सभापती विनोद तांबे यांनी शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांच्याकडून शिक्षकांबाबत माहिती जाणून घेतली तेव्हा गैरसोय होत असल्यामुळे बदली झालेले शिक्षक शाळेवर रुजू झालेले नसल्याचे समजले. ते सर्व शिक्षक सोयीच्या ठिकाणी असलेल्या शाळांमध्ये पदस्थापना मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते.
बदली झाल्यानंतरही बेकायदेशीरपणे गैरहजर असलेल्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्दड यांच्याकडे पालक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार अर्दड यांनी त्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आठवडाभराचा कालावधी लोटला; पण अद्यापपर्यंत एकाही शिक्षकाविरुद्ध शिक्षण विभागाने कारवाई केलेली नाही, हे विशेष!