२० जोडपी झाली विवाहबद्ध
By Admin | Published: April 24, 2016 11:42 PM2016-04-24T23:42:07+5:302016-04-25T00:50:53+5:30
औरंगाबाद : रविवारचा दिवस...सिडकोतील राजीव गांधी मैदानात हजारो वऱ्हाडी आले होते... मैदानाच्या मध्यभागी व्यासपीठ उभारण्यात आले होते.
औरंगाबाद : रविवारचा दिवस...सिडकोतील राजीव गांधी मैदानात हजारो वऱ्हाडी आले होते... मैदानाच्या मध्यभागी व्यासपीठ उभारण्यात आले होते. त्यावर एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल २० वधू-वर एकमेकांसमोर हार घेऊन उभे होते....भर दुपारची वेळ असतानाही जिल्ह्यातून वऱ्हाडी मंडळी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी जमले होते आणि मैदानात मंगलाष्टकाचा स्वर घुमला... अमोल जोशी गुरुजींनी शुभमंगल सावधान असे उच्चारताच उपस्थितांनी नवदाम्पत्यांवर फुलांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे सर्व वधू-वर शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील होते. एक आदर्श सामुदायिक विवाह सोहळा अनुभवल्याचा सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
‘आता आमचा एकच ध्यास, चला तोडू या हुंड्याचा फास, उन्नतीची कास धरू, कमी खर्चात लग्न करू’ असा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची ३८६ वी जयंती वर्ष व जगद्गुरू संत जनार्दन मौनगिरीजी महाराज यांच्या १०१ व्या जयंती वर्षानिमित्त शेतकरी कुटुंबातील वधू-वरांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने झुंबरशेठ मोडके व राजेंद्र पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. सिडको एन-५ येथील राजीव गांधी मैदान सकाळपासून वऱ्हाडी मंडळींनी फुलून गेले होते. मैदानाच्या मध्यभागी आडवा लांबलचक स्टेज उभारण्यात आला होता. त्यावर २० वधू-वरांची नावे लिहिण्यात आली होती. सर्व वधू-वर एकमेकांच्या समोर उभे राहिले. मधे अंतरपाट धरण्यात आला. मामा पाठीमागे उभे होते. जनेश्वरानंद महाराज यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिला.
यानंतर जोशी गुरुजींनी मंगलाष्टकाला सुरुवात केली. मान्यवरांची उपस्थिती
माजी आ. डॉ. कल्याण काळे, विजयअण्णा बोराडे, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, नगरसेवक नंदकुमार घोडेले, शिवाजी दांडगे, कृष्णा पाटील डोणगावकर, किरण डोणगावकर, राजेश सरकटे बंधू, विनोद पाटील, अभिजित पाटील, किरण पाटील, राजेश जाधव, सुदाम सोनवणे, वीरभद्र गादगे, विजय कल्याणकर, बद्रीनाथ ठोंबरे, बाळासाहेब रांजणीकर, अशोक वीरकर, जयेश लड्डा, गजानन देशमुख, प्रशांत अवसरमल, एकनाथ नवले, रेड स्वस्तिकचे भगवान राऊत व सदस्य, बाबाजी भक्त मंडळाच्या सर्व भक्तांची उपस्थिती होती.