मंत्रिमंडळ बैठकीवर धडकणार २० मोर्चे, २५० शिष्टमंडळे

By Admin | Published: October 4, 2016 12:39 AM2016-10-04T00:39:41+5:302016-10-04T00:54:37+5:30

औरंगाबाद : मंगळवारी शहरात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी विविध पक्ष, संघटनांचे सुमारे २० मोर्चे काढण्यात येणार आहेत

20 meetings, 250 delegations will be attacked in the Cabinet meeting | मंत्रिमंडळ बैठकीवर धडकणार २० मोर्चे, २५० शिष्टमंडळे

मंत्रिमंडळ बैठकीवर धडकणार २० मोर्चे, २५० शिष्टमंडळे

googlenewsNext


औरंगाबाद : मंगळवारी शहरात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी विविध पक्ष, संघटनांचे सुमारे २० मोर्चे काढण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे तर २५० हून अधिक शिष्टमंडळे मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करणार आहेत. बैठकीसाठी शहरात राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या, ९ आयपीएस अधिकाऱ्यांसह सुमारे चार हजार पोलिसांचा फौजफाटा विविध ठिकाणी तैनात करण्यात आला. यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आले आहे.
२००८ नंतर प्रथमच मराठवाड्याच्या प्रश्नांवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादेत होत आहे. या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ शहरात दाखल होत आहे. यासोबत मंत्रालयातील प्रमुख अधिकारी, कर्मचारीही शहरात सोमवारीच दाखल झाले. विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक होत असून सुभेदारी विश्रामगृह येथे मुख्यमंत्री आपल्या सहकारी मंत्र्यांसह थांबणार आहेत. शिवाय चिकलठाणा विमानतळ ते सुभेदारी विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचा ताबा सोमवारी दुपारपासूनच पोलिसांनी घेतला. दोन दिवसांपासून या महत्त्वाच्या ठिकाणांची पोलीस, गुप्तचर संस्था, बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून तपासणी केली जात आहे. या बैठकीच्या अनुषंगाने अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील सुमारे २५० वेगवेगळी शिष्टमंडळे मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना निवेदन देणार आहेत. शिवाय मराठवाड्यातील प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीसह २० संघटनांकडून मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांनी दिली.
आयुक्तालयाचा मार्ग बंद
मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने बरेच मोर्चे काढण्यात येणार आहेत. शिवाय निवेदने देण्यासाठीही नागरिकांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर व्हीआयपींचा प्रवास विनाअडथळा व्हावा, यासाठी पोलिसांनी विभागीय आयुक्त, सुभेदारी विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मार्ग वाहनांसाठी बंद केले आहेत.
याविषयी वाहतूक शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ बैठकीवर येणाऱ्या मोर्चांना आमखास मैदान येथे अडविण्यात येणार आहे. यामुळे आमखास
(पान १ वरून)
मैदान ते सुभेदारी विश्रामगृह, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग मंगळवारी बंद राहणार आहे. तर विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने हर्सूल कारागृहाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे येणारी सर्व वाहने उद्धवराव पाटील चौकात रोखली जाणार आहेत. उद्धवराव पाटील चौकापासून पुढे मार्ग बंद राहणार आहे.
शहागंजकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्र्ग बंद ठेवण्यात येणार आहे. तर पंचायत समिती कार्यालयाकडून येणारी वाहने विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानासमोर अडविण्यात येतील.

सुभेदारीत मंत्र्यांना भेटण्याची व्यवस्था
मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त शहरामध्ये सुमारे ३९ मंत्र्यांचा ताफा येत आहे. त्यामध्ये २३ कॅबिनेट आणि १६ राज्यमंत्र्यांचा समावेश असून, २० सचिव सोबत असतील. सुभेदारी विश्रामगृहातच दोन मोठे मंडप उभारण्यात आले असून, तेथे पासधारक नागरिकांना मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर करता येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल तथा बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे सुभेदारीच्या मुख्यालयात थांबतील. पालकमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी सकाळपासून बैठकीच्या तयारीचा पूर्ण आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची उपस्थिती होती. विभागीय आयुक्तालयातील मुख्य सभागृहात ६० जणांची आसन व्यवस्था बैठकीसाठी करण्यात आलेली आहे. कॅबिनेट मीटिंग असल्यामुळे त्या बैठकीला लोकप्रतिनिधींना उपस्थित राहता येणार नाही. तसेच आयुक्तालयाच्या परिसरात लोकप्रतिनिधींसाठी आसन व्यवस्था करण्यात आली असून, तेथे मुख्यमंत्री लोकप्रतिनिधींशी विविध विषयांवर चर्चा करतील. दुपारी २ वा. स्वातंत्र्यसैनिकांना मुख्यमंत्री सुभेदारीत भेटतील. विविध संघटनांची १२५ निवेदने आलेली आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीवर परवानगी देण्यात आलेल्या मोर्चांसाठी तीन मार्ग देण्यात आले आहेत. असे असले तरी या सर्व मोर्चांचा शेवट आमखास मैदानावरच करण्यात येणार आहे.

४क्रांतीचौक येथून काही मोर्चे निघणार आहेत. हे सर्व मोर्चे सकाळी ११ वाजेनंतर निघतील आणि दुपारी २ ते ३ पर्यंत त्यांचा समारोप होईल.

४क्रांतीचौकाकडून येणारे मोर्चे पैठणगेट, सिटीचौक, किलेअर्कमार्गे आमखास मैदानावर जातील.

४शहागंज येथील गांधी पुतळा येथून निघणारे मोर्चेही शहागंज, सराफा, सिटी चौक, सागर हॉटेलमार्गे किलेअर्ककडून आमखास मैदानावर पोहोचतील.

४मिलकॉर्नरकडून येणारे मोर्चे थेट पोलीस आयुक्त कार्यालयासमोरून टाऊन हॉल उड्डाणपूलमार्गे आमखास मैदान असे जातील.
बंदोबस्तासाठी ९ अधीक्षक व उपायुक्त, ९६ पोलीस निरीक्षक, २०० सहायक निरीक्षक आणि फौजदार, २,७०० पोलीस कर्मचारी, राखीव दलाच्या चार तुकड्या, अतिशिघ्र कृती दलाच्या पाच तुकड्या, बॉम्बशोधक व नाशक विभागाची ८ पथके, गोपनीय शाखेचे कर्मचारी, स्थानिक पोलीस, दंगल काबू पथक, स्ट्रायकिंग फोर्स तसेच वज्रचा बंदोबस्तात समावेश करण्यात आल्याची माहिती उपायुक्त संदीप आटोळे यांनी दिली.

Web Title: 20 meetings, 250 delegations will be attacked in the Cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.