नाथसागराच्या पाण्यात जॅकवेल उभारण्यासाठी २० मीटर खोदकाम; १३ जेसीबी लागल्या कामाला
By मुजीब देवणीकर | Published: October 27, 2023 06:59 PM2023-10-27T18:59:51+5:302023-10-27T19:01:50+5:30
जायकवाडी धरणात साडेआठ मीटरपर्यंत खोदकाम पूर्ण
छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. नाथसागराच्या पाण्यात जॅकवेल (उद्भव विहीर) बांधण्यासाठी तब्बल २० मीटरपर्यंत खोल, १०० मीटर रुंद तर ३०० मीटर लांब असे खोदकाम करावे लागणार आहे. आतापर्यंत साडेआठ मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आले. १३ जेसीबींच्या मदतीने नोव्हेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. जॅकवेलचे काम डिसेंबर २०२४ पूर्वी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.
२०५० मध्ये शहराची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. २०४० कोटी रुपये योजनेवर खर्च होत असून, १ हजार कोटी रुपये केंद्र, राज्य शासनाने दिले आहेत. शहरात ५३ जलकुंभ, जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मिमी व्यासाठी मोठी जलवाहिनी, नक्षत्रवाडीच्या डोंगरावर सहा जलशुद्धीकरण केंद्रे, शहरात १८०० किमी अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे उभारणे, जायकवाडी धरणात जॅकवेल इ. कामांचा यात समावेश आहे.
पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा खंडपीठाकडून वारंवार आढावा घेतला जात आहे. मुख्य जलवाहिनीचे काम ३९ किलोमीटरपैकी आतापर्यंत २२ किलोमीटर काम झाले असून, आणखी ७ किलोमीटर जलवाहिन्या रस्त्यावर आहेत. त्यासोबतच सध्या १८ जलकुंभांचे काम हाती घेण्यात आले आहे. ९ जलकुंभांचे काम प्रगतिपथावर असून, उर्वरित जलकुंभांच्या कामाला सुरुवात झालेली नाही. कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने ३५ जलकुंभांच्या कामाला दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू आहे. जॅकवेलच्या कामाला सुरुवात झाली आहे. पाणी योजना कार्यान्वित होण्यासाठी जॅकवेलचे काम वेळेवर पूर्ण होणे गरजेचे आहे.
जायकवाडीच्या पाण्यात भिंत
पाऊस कमी झाल्यामुळे नाथसागर भरलाच नाही. नाथसागर भरल्यास जॅकवेलच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये, पाणी आत येऊ नये यासाठी दोन मीटर उंचीची व्हर्टिकल भिंत तयार करण्यात आली आहे. पुढील वर्षी धरण भरले तरी जॅकवेलच्या कामात अडथळा येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.