२० टक्के भूखंड लघुउद्योगांसाठी

By Admin | Published: August 11, 2016 01:17 AM2016-08-11T01:17:43+5:302016-08-11T01:26:45+5:30

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) उभारण्यात येणाऱ्या औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीतील (आॅरिक) २० टक्के भूखंड मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योगांसाठी राखीव ठेवले जातील,

20 percent plot for small scale industries | २० टक्के भूखंड लघुउद्योगांसाठी

२० टक्के भूखंड लघुउद्योगांसाठी

googlenewsNext

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) उभारण्यात येणाऱ्या औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीतील (आॅरिक) २० टक्के भूखंड मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योगांसाठी राखीव ठेवले जातील, असे उद्योग खात्याचे प्रधान सचिव अपूर्वचंद्रा यांनी बुधवारी येथे सांगितले.
‘डीएमआयसी’तील भूखंडांचे दर २४ आॅगस्टपर्यंत निश्चित केले जातील. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी भूखंडांचे वाटप करण्यासाठी आॅनलाईन अर्ज मागविले जातील. पाच कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक असणाऱ्या मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योगांसाठी यातील २० टक्के भूखंड राखीव ठेवले जातील. नियोजित आॅरिक सिटीमध्ये हॉटेल, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये यासाठीदेखील भूखंड राखीव असतील. दर निश्चित झाल्यानंतर या भूखंडांच्या वाटपाचे धोरण ठरविले जाईल, असेही अपूर्वचंद्रा यांनी नमूद केले.
मोठ्या उद्योगांना प्राधान्य
प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य (फर्स्ट कम फर्स्ट बेसिस) या तत्त्वावर भूखंडांचे वाटप केले जाणार नाही. गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांचे ‘प्रोफाईल’ तपासूनच भूखंडाचे वाटप केले जाईल. मेगा गुंतवणूक करणाऱ्या बहुराष्ट्रीय उद्योगांना यात प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दहा वर्षांत भरभराट
जायकवाडीत मुबलक पाणी उपलब्ध असले, तरीही औरंगाबाद शहराच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर केला जाणार आहे. ‘डीएमआयसी’मध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. रस्ते, उड्डाणपुलांची कामेही प्रगतिपथावर आहेत. भूमिगत वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा केला जाणार आहे. सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठीदेखील दोन स्वतंत्र वाहिन्या असतील. गुंतवणुकीसाठी हे चित्र आशादायक राहील. येत्या दहा वर्षांत औरंगाबादची भरभराट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘बिडकीन’चे काम जानेवारीत
बिडकीन पार्कमधील पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी डिसेंबरअखेर निविदा मागविण्यात येतील. जानेवारी महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
४औरंगाबाद ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येणार असल्याने बिडकीन पार्कमधील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास ‘एमआयडीसी’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमकुमार यांनी व्यक्त केला.
अल्केशकुमार शर्मा प्रथमच शहरात
‘डीएमआयसी’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अल्केशकुमार शर्मा हे प्रथमच शहरात आले आहेत. शेंद्रा परिसरात सुरू असलेल्या कामांचा ते गुरुवारी आढावा घेतील.

Web Title: 20 percent plot for small scale industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.