२० छावण्यांना मंजुरी
By Admin | Published: August 26, 2015 11:47 PM2015-08-26T23:47:10+5:302015-08-26T23:47:10+5:30
बीड : छावणी उभारण्याचा शासन निर्णय होऊन आठवडाभराचा कालावधी लोटत आला आहे तरी देखील बीड जिल्ह्यात प्रत्यक्ष छावण्या उभारून
बीड : छावणी उभारण्याचा शासन निर्णय होऊन आठवडाभराचा कालावधी लोटत आला आहे तरी देखील बीड जिल्ह्यात प्रत्यक्ष छावण्या उभारून मुक्या जितराबांना चारा मिळालेला नाही. छावण्या वाटपात होत असलेल्या राजकारणामुळे जनावरांची तरफड सुरू आहे. आता तर छावण्या मंजुरीसाठी सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या शिफारशींचा पाऊस सुरू असल्याचे चित्र महसूल प्रशासनात पहावयास मिळत आहे. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत २० छावण्यांना मंजुरी मिळाली आहे.
जिल्ह्यात साडेनऊ लाखाच्या जवळपास लहान-मोठी जनावरे आहेत. चाऱ्याअभावी पशुमालक हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने तात्काळ छावण्या सुरू करणे अपेक्षित होते. होत असलेल्या छावणी उभारणीच्या विलंबामुळे चाऱ्याअभावी जनावरांची तडफड सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी शिरूर कासार तालुक्यातील एका शेतकऱ्याने चक्क जनावरांचा चारा संपला म्हणून फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. एवढी भयाण परिस्थिती निर्माण झालेली असतानाही पुढाऱ्यांकडून छावणीत राजकारण होत आहे. एवढेच नाही तर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर छावणी मंजुरीसाठी दबाव आणला जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
गाव एक शिफारस पत्र अनेक
कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी मागेल त्या कार्यकर्त्याला नेत्याकडून शिफारस पत्र मिळत असल्याचे चित्र मागील दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. एका गावात एका ठिकाणी एक छावणी उभारण्यासाठी नेत्यांनी आपल्या दोन ते तीन कार्यकर्त्यांना पत्र दिलेले असल्याने कार्यकर्तेही संभ्रमात पडले होते. यामध्ये बीड जिल्ह्यातील एका विद्यमान आमदाराने चक्क एका ठिकाणच्या छावणीमंजुरीसाठी दोन ते तीन जणांना पत्र दिले असल्याचे एका कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शिफारस पत्रांचा हा पाऊस सुरू असल्याने कार्यकर्त्यांसमोर नेते उघडे पडत आहेत.
कार्यकर्त्यांनाही आपल्या नेत्याचे आश्चर्य वाटत आहे. एका गावातून दोन ते तीन कार्यकर्त्यांना छावण्या सुरू करण्याचे शिफारसपत्र दिले असल्याने दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चर्चेला उधाण आले होते. (प्रतिनिधी)
गुरूवारी छावणीचे मंजूरीपत्र मिळाल्यानंतर प्रत्यक्ष चारा छावणी सुरू होण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे चारा मिळण्यास अजून विलंब लागत असल्याने पशुमालक चिंतेत आहे.
बुधवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतलेल्या बैठकीत २० छावण्यांना मंजुरी दिली आहे. यामध्ये आष्टी ४, बीड ३, पाटोदा २, शिरूर कासार १ यासह इतर तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक अशा छावण्यांना मंजुरी दिली आहे. दरम्यान इतर तालुक्यांमधून देखील छावणी मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे आले आहेत.
ज्या संस्था छावणी चालविण्यास सक्षम आहेत त्यांनाच चारा छावणीची मंजूरी देण्यात येईल. दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन छावणीचालकांनीही कामामध्ये तत्परता दाखवावी. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे छावणी चालकांनी तंतोतंत पालन करणे आवश्य आहे. जे कोणी छावणी चालविताना नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. छावण्या तात्काळ सुरू करण्यात येतील.
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी