मराठवाड्यात आयटीआयच्या २० हजार जागा; सोमवारपासून प्रवेश प्रक्रियेला होणार सुरूवात

By राम शिनगारे | Published: May 31, 2024 01:31 PM2024-05-31T13:31:20+5:302024-05-31T13:34:34+5:30

मिशन ॲडमिशन: दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आयटीआय, पॉलिटेक्निक आणि अकरावीच्या तीन शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

20 thousand ITI seats in Marathwada; The admission process will start from Monday | मराठवाड्यात आयटीआयच्या २० हजार जागा; सोमवारपासून प्रवेश प्रक्रियेला होणार सुरूवात

मराठवाड्यात आयटीआयच्या २० हजार जागा; सोमवारपासून प्रवेश प्रक्रियेला होणार सुरूवात

छत्रपती संभाजीनगर : दहावीनंतर झटपट प्रशिक्षण घेत नोकरी मिळविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेला येत्या सोमवारपासून सुरुवात होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये खासगी आणि शासकीय आयटीआयमध्ये २० हजार ८२८ जागा उपलब्ध असणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आयटीआय, पॉलिटेक्निक आणि अकरावीच्या तीन शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. आई-वडिलांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक विद्यार्थी दहावीनंतर आयटीआयचा मार्ग निवडतात. आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तत्काळ नोकरी मिळते. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठीही तांत्रिक प्रशिक्षण मिळालेले असते. त्यामुळे विद्यार्थी लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहतो. त्यासाठी अनेक विद्यार्थी आयटीआयला प्राधान्य देतात. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला येत्या सोमवारपासून सुरुवात होणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

कोणत्या जिल्ह्यात किती जागा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शासकीय आयटीआय ११ महाविद्यालयांत २ हजार ३२ जागा उपलब्ध आहेत तर खासगीच्या ८ मध्ये ५१६ जागा आहेत. बीड जिल्ह्यात १२ सरकारीमध्ये १९४४ तर १७ खासगीमध्ये १५००, हिंगोलीत ६ सरकारीत ६०४ तर ३ खासगीत ३३२, जालनात ७ शासकीयमध्ये १३१६, तर ४ खासगीत १००, लातूरमध्ये ११ शासकीयमध्ये २५३२, तर ११ खासगीत ९३६, नांदेडमध्ये १७ सरकारीत २६८८, तर ८ खासगीत १८२४, धाराशिवमध्ये ८ सरकारीत १५०८ तर १० खासगीत ५८४ आणि परभणीत ९ शासकीय आयटीआयमध्ये १४६८ तर ६ खासगीमध्ये ९४४ जागा उपलब्ध आहेत.

मराठवाड्यातील आयटीआयची आकडेवारी
संस्था....................... कॉलेजची संख्या...........उपलब्ध जागा

सरकारी.....................८२...........................१४०९२
खाजगी................६७..................................६७३६
एकूण.................१४९.................................२०,८२८

आयटीआय प्रवेशाची टक्केवारी वाढणार
मागील वर्षी कमी मागणीचे अभ्यासक्रम बंद करून जास्त मागणी असलेले अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर राज्य शासनाच्या विविध योजनांतून अद्ययावत यंत्रसामग्रीची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची टक्केवारी वाढणार आहे.
-अभिजित आलटे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर

Web Title: 20 thousand ITI seats in Marathwada; The admission process will start from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.