२० हजारांची लाच मागितली; पण घेतली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:00 PM2018-12-18T23:00:59+5:302018-12-18T23:01:38+5:30
घराच्या दोन्ही मीटरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाच्या प्रमुखाने दंडाची रक्कम कमी करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. अखेर २० हजारांवर तडजोड होऊन लाच स्वीकारण्यासाठी संपर्क केला व नंतर ती घेण्यास नकार दिला.
औरंगाबाद : घराच्या दोन्ही मीटरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाच्या प्रमुखाने दंडाची रक्कम कमी करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. अखेर २० हजारांवर तडजोड होऊन लाच स्वीकारण्यासाठी संपर्क केला व नंतर ती घेण्यास नकार दिला. याप्रकरणी कार्यकारी अभियंता रामेश्वर नारायण सोनत यास लाचलुचपत प्रतिबंध पथकाने महावितरणच्या कार्यालयातच ताब्यात घेतले.
तक्रारदार हे शेती करतात. महावितरणच्या भरारी पथकाने त्यांच्या राहत्या घराची अचानक पाहणी करून दोन्ही मीटरची तपासणी केली. ते मीटर फॉल्टी असून, फेरफार केल्याने तुम्हाला कमी बिल येत होते. आता दंडात्मक कारवाईत किमान पाच लाख रुपये रक्कम भरावी लागतील, असे मिल कॉर्नरच्या कार्यालयात बोलावून अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरारी पथकप्रमुख रामेश्वर सोनत यांनी सांगितले.
रक्कम कमी करायची असल्यास ५० हजार रुपये लाचेची सरळ मागणी केली; परंतु फिर्यादीला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात संपर्क साधून तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने चाचपणी केली असता २० हजार रुपये लाच घेण्याचे स्पष्ट झाले.
तक्रारदार व पथक लाचेची रक्कम घेऊन गेले असता त्याने स्वीकारण्यास नकार दिला असला, तरी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक शंकर जिरगे, उपअधीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन गवळी, पोलीस नाईक भीमराज जिवडे, अश्वलिंग होनराव, दिगंबर पाठक, संतोष जोशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.