अवैध वाळू वाहतुकीची २० वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2017 11:45 PM2017-07-08T23:45:37+5:302017-07-08T23:49:46+5:30
परभणी : विधानमंडळ अंदाज समितीने दोन दिवसांपूर्वी पोलीस व महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांची अवैध वाळू उपसा प्रकरणात कारवाई होत नसल्याने झाडाझडती घेतल्यानंत
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विधानमंडळ अंदाज समितीने दोन दिवसांपूर्वी पोलीस व महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांची अवैध वाळू उपसा प्रकरणात कारवाई होत नसल्याने झाडाझडती घेतल्यानंतर शनिवारी पोलिसांच्या पथकाने पालम तालुक्यातील पारवा शिवारात कारवाई करीत २० वाहने जप्त केली आहेत.
५ व ६ जुलै रोजी विधानमंडळ अंदाज समिती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती. या समितीने गंगाखेड, पाथरी तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीचे वास्तव चित्र पाहिले होते. त्यानंतर गंगाखेड तालुक्यातील दोन तलाठी व एका मंडळ अधिकाऱ्याला समितीच्या संतापानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले होते. पाथरीत मात्र गोदावरी पात्रातून वाळू उपसा करणाऱ्या काही टिप्पर चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ४ पोकलेन मशीन व तीन टिप्पर पळून गेले होते. या प्रकरणात समितीने गुरुवारी पोलीस व महसूल विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन व पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या आदेशानुसार विश्व पानसरे, सपोनि. ननवरे, चोरमले, पोह.सिरसकर, बाविस्कर, टेंगसे, खंदारे, पोना. टिप्पलवाड, पोशि. स्वामी, लांडगे, टेकाळे, राठोड, शकील, मुस्तफा, तिडके, मोडके, जोंधळे, एकीलवाले यांच्या पथकाने पालम तालुक्यातील पारवा शिवारात कारवाई केली. त्यामध्ये महसूल विभागाने सील केलेल्या वाळू साठ्यातून अवैधरीत्या रेती चोरुन नेत असताना ३ हायवा टिप्पर पकडले. तसेच अवैध वाळू चोरुन वाहनात भरण्याच्या तयारीत असलेले १७ ट्रक पकडले. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, उपविभागीय अधिकारी भोसले, पालमचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक शर्मा यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर ताब्यात घेतलेली वाहने व जप्त केलेला १५ ब्रास वाळूसाठ्याचा पंचनामा करण्यात आला.
याबाबत मंडळ अधिकारी विजय बोधले यांच्या फिर्यादीवरुन पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.