प्रेयसीच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्षें सक्तमजुरी
By प्रभुदास पाटोळे | Published: December 12, 2023 03:58 PM2023-12-12T15:58:42+5:302023-12-12T15:59:28+5:30
एक लाख ६१ हजार रुपये दंड ; त्यापैकी ४० हजार रुपये पीडितेला भरपाई
छत्रपती संभाजीनगर : प्रेयसीच्या ७ वर्षांच्या मुलीवर बळजबरी अत्याचार करणारा परमेश्वर कचरू बांबर्डे (३७, रा. छत्रपती संभाजीनगर, मूळ रा. ता. फुलंब्री) याला सत्र न्यायाधीश के.आर. चौधरी यांनी २० वर्षें सक्तमजुरी आणि एकूण एक लाख ६१ हजार रुपये दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी ४० हजार रुपये पीडितेला भरपाई देण्याचेही आदेशात म्हटले आहे.
याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनेच्या १० वर्षांपूर्वीपासून तिचे परमेश्वरशी प्रेमसंबंध होते. दरम्यानच्या काळात तिचे लग्न झाले, तिला ७ आणि ५ वर्षांच्या मुली आहेत. घटनेच्या १० महिन्यांपूर्वी प्रेमसंबंधाची माहिती तिच्या पतीला समजल्यामुळे त्याने तिला सोडून दिले. तेव्हापासून महिला मुलींसह परमेश्वरसोबत राहत होती. २३ ऑगस्ट २०२२ रोजी परमेश्वरने चिमुकलीवर अत्याचार केला. तिच्या ओठांना चटका देऊन, ‘आईला काही सांगू नको’ अशी धमकी दिली. पीडितेच्या ओठांना दुखापत झाल्याने आईने तिला विचारले असता तिने घटना सांगितली. महिलेने परमेश्वरला जाब विचारला असता त्याने तिला मारहाण करून, तिला व मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
उपनिरीक्षक प्रतिमा अंबुज यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी ७ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादंविच्या कलम ३७६ (एफ) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, कलम ३५४(बी) अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, कलम ३२३ आणि ५०६ अन्वये अनुक्रमे एक महिना आणि ३ महिने सक्तमजुरी, तसेच पॉक्सोच्या कलम ६ अन्वये २० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंड, कलम ८ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड, कलम १२ अन्वये ३ महिने सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, बाल न्याय हक्काच्या कलम ७५ नुसार २० वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंड ठोठावला. पैरवी अधिकारी सहायक फौजदार रज्जाक शेख यांनी सहकार्य केले.