अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला २० वर्षे सक्तमजुरी

By प्रभुदास पाटोळे | Published: November 24, 2023 02:20 PM2023-11-24T14:20:38+5:302023-11-24T14:24:32+5:30

पोक्सोसह भादंविनुसार शिक्षा; एकूण २१ हजार रुपये दंड

20 years hard labor for sexually assaulting a minor girl | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला २० वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला २० वर्षे सक्तमजुरी

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी लखन भिकन नरवडे (२२) याला विशेष सत्र न्यायाधीश ए.एस. वैरागडे यांनी गुरुवारी (दि. २३) २० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली २१ हजार रुपये दंड ठोठावला.

याबाबत अल्पवयीन (१३ वर्षे ८ महिने) पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे आई-वडील मोलमजुरी करतात. मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील हे जोडपे कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. पीडिता ही आजीच्या गावी शिक्षण घेत होती. घटनेच्या दोन महिन्यांपूर्वीच ती आई-वडिलांकडे आली होती. ते तिसऱ्या मजल्यावर आणि आरोपी त्याच इमारतीच्या तळमजल्यावर भाड्याने राहतात.
२० जून २०२२ रोजी पीडितेचे आई-वडील कामावर गेले होते. पीडिता व तिचा लहान भाऊ (१०) घरी होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास पीडितेचा भाऊ खेळण्यासाठी बाहेर गेला होता. ही संधी साधत आरोपी लखन तिच्या घरी गेला व तुझा भाऊ तुला खाली बोलावतो असे सांगितले. मात्र पीडिता घराबाहेर आली नाही. त्यामुळे आरोपीने तिच्या घरात घुसून पीडितेचा हात धरून तिला तळमजल्यावरील बाथरूममध्ये नेऊन बळजबरी अत्याचार केला. ही घटना कोणाला सांगितल्यास तिला ठार मारण्याची धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेला होता. घटनेच्या दुसऱ्या दिवशी २१ जून २०२२ रोजी सकाळी पीडितेने घडलेला प्रकार आईला आणि त्यानंतर दोघींनी आरोपीच्या आईला सांगितला. त्यानंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.

तपासाअंती उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणी वेळी सहायक लोकअभियोक्ता बी.आर. लोया यांनी ८ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात पीडिता, तिची आई, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी लखन नरवडे याला दोषी ठरवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोक्सोच्या कलम ४(२) अन्वये २० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंड ठोठावला. तसेच पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली भादंवि कलम ५०६ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड ठोठावला.

Web Title: 20 years hard labor for sexually assaulting a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.