मनपाचे २०० कर्मचारी वेळेवर येतच नाहीत; आयुक्तांनी काढले शोधून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:02 PM2018-09-29T12:02:35+5:302018-09-29T12:05:53+5:30
मुख्यालयाच्या दोन्ही इमारतींमध्ये सकाळी १० वाजता कार्यालयात हजर न राहणाऱ्या तब्बल २०० कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी एका गोपनीय पथकामार्फत शोधून काढले आहे.
औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यालयाच्या दोन्ही इमारतींमध्ये सकाळी १० वाजता कार्यालयात हजर न राहणाऱ्या तब्बल २०० कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी एका गोपनीय पथकामार्फत शोधून काढले आहे. आता या कर्मचाऱ्यांवर आयुक्त काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयुक्तांचे भरारी पथक शहरातही ठिकठिकाणी अशाच पद्धतीने पाहणी करुन गैरहजर कर्मचाऱ्यांचा शोध घेणार आहे.
महापालिकेत सर्वसामान्य नागरिक समस्या घेऊन कमी येतात; परंतु दलाल सर्वाधिक येतात, असे विधान मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी बुधवारी केले होते. या विधानावरून महापालिकेत राजकीय वादळ उठले आहे. औरंगाबादकरांनी गुरुवारी ‘लोकमत’च्या माध्यमाने आयुक्तांना सल्ला दिला की, दलालांवर सर्जिकल स्ट्राईक करावे. आयुक्त डॉ. निपुण हे शुक्रवारी सकाळी ९ वाजताच मुख्यालयात हजर झाले. त्यांनी आपल्या विश्वासातील तीन कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. या भरारी पथकाला प्रत्येक विभागात जाऊन दहा वाजता कार्यालयात हजर नसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादीच आणायला सांगितली.
अवघ्या ३० मिनिटांमध्ये काढले शोधून
भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी अवघ्या ३० मिनिटांमध्ये आयुक्तांना २०० गैरहजर कर्मचाऱ्यांची यादी सादर करून शाबासकी मिळविली. याच भरारी पथकाला शहरातही विविध कामांची गोपनीय माहिती काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. लवकरच याचाही अहवाल आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये काजकाज कशापद्धतीने चालते, दलाली कुठे जास्त फोफावलेली आहे, याचीही माहिती घेण्यात येत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
बिनधास्त मामला
मागील काही महिन्यांपासून आयुक्त मुख्यालयात येतच नव्हते. त्यामुळे कधीही या कधीही जा, अशी अवस्था अधिकारी व कर्मचाऱ्यांची होती. मागील तीन ते चार दिवसांपासून आयुक्त सकाळी चार ते पाच तास महापालिकेच्या मुख्यालयात थांबत आहेत. त्यामुळे मुख्यालयातील कामकाजाला थोडीफार शिस्त तरी लागली आहे. त्यातही शुक्रवारी आयुक्तांनी गैरहजर कर्मचाऱ्यांची अनोख्या पद्धतीने हजेरी घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.