२ हजारांच्या नोटा व्यवहारातून गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 01:18 PM2020-10-11T13:18:21+5:302020-10-11T13:19:03+5:30
मागील काही महिन्यांपासून दैनंदिन व्यवहारात २ हजार रूपयांच्या नोटा दिसणे कमी होत चालले आहे. एटीएममधूनही २००० च्या नोटेऐवजी ५००, २०० व १०० रूपयांच्या नोटा मिळत आहेत.
औरंगाबाद : मागील काही महिन्यांपासून दैनंदिन व्यवहारात २ हजार रूपयांच्या नोटा दिसणे कमी होत चालले आहे. एटीएममधूनही २००० च्या नोटेऐवजी ५००, २०० व १०० रूपयांच्या नोटा मिळत आहेत. हळूहळू व्यवहारातून २००० ची नोट गायब होत चालल्यामुळे या नोटांची साठेबाजी तर होत नाही ना, अशी शंका काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
सध्या बाजारात २००० रूपयांच्या नोटेची कमतरता प्रखरतेने जाणवत आहे. याविषयी सांगताना व्यापारी म्हणाले की, लॉकडाऊनपुर्वी २००० च्या १४ ते १५ नोटा दररोज व्यवहारात दिसत होत्या. आता मात्र ८ दिवसांतून २ ते ३ नोटाच येत आहेत. तसेच एटीएममधूनही २००० ची नोट येणे आता जवळपास अशक्य झाले आहे.
याविषयी सांगताना बँक अधिकारी म्हणाले की, रिझर्व्ह बँकेकडूनही २ हजार रूपयांच्या नोटा येणे कमी झाले आहे. त्यामुळे काही बँकांनी उपलब्ध नोटांनुसार एटीएमची रचना बदलण्यास सुरूवात केली आहे. मागील दोन वर्षांत देशात बाजारातून १ लाख, १० हजार, २४७ कोटी रूपयांच्या २ हजारांच्या नोटा कमी झाल्याचे वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी काही दिवसांपुर्वीच लोकसभेत सांगितले होते.