गायब झालेल्या २ हजाराच्या नोटा अवतरल्या; बाजारात दररोज २ कोटीची गुलाबी रोकड गल्ल्यात
By प्रशांत तेलवाडकर | Published: May 26, 2023 11:53 AM2023-05-26T11:53:36+5:302023-05-26T11:53:45+5:30
नोट बदलण्यासाठी काही बँकेत, वीजबिल केंद्रावर मागितले जातेय आधारकार्ड
छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी व्यवहारातून गायब झालेल्या २ हजाराच्या गुलाबी नोटा पुन्हा एकदा बाजारपेठेत अवतरल्या आहेत. ग्राहकही बँकेत नोटा बदलून घेण्याऐवजी व्यवहारात गुलाबी नोट देणे पसंत करीत आहेत. यामुळे पेट्रोलपंपापासून ते किराणा दुकानापर्यंत दररोज कमीत कमी २ कोटी मुल्याच्या गुलाबी नोटा चलनात येत असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया यांनी व्यक्त केला आहे.
व्यापाऱ्यांना नकली नोटांची भीती
२ हजारांच्या नोटा ३० सप्टेंबरनंतर व्यवहारातून बाद होणार आहेत. तोपर्यंत या गुलाबी नोटा व्यवहारात चालणार आहेत. यामुळे व्यापारी गुलाबी नोटा स्वीकारत आहेत. यास काही व्यापारी अपवादही आहेत. ते गुलाबी नोटा स्वीकारण्यास तयार नाहीत. असली की नकली २ हजारची नोट तपासणीसाठी त्यांच्याकडे मशिन नाही, २ हजारची एखादी नोट नकली आली तर नंतर कोण भरून देणार, अशी कारणे व्यापारी सांगत आहेत. मात्र, नेहमीच्या ओळखीच्या ग्राहकांकडून गुलाबी नोटा ते स्वीकारत आहेत. काही व्यापारी आधारकार्डची झेरॉक्स मागत असल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांमध्ये नकली नोटांविषयी भीती पाहण्यास मिळाली.
काही बँका मागताहेत आधार, पॅन कार्ड
स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक व आदी राष्ट्रीयीकृत बँकांचा अपवाद वगळता, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व अन्य बँकेत २ हजारची नोट बदलून देण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड मागताना दिसून आले.
करन्सीचेस्टमध्ये ६ कोटी जमा
एसबीआयच्या करन्सीचेस्टमध्ये आतापर्यंत २ हजार रुपयांच्या सहा कोटीच्या नोटा जमा झाल्या आहेत. यात काही शहरी व ग्रामीण भागातील बँकेच्या शाखांचाही समावेश आहे. त्यांनी २ हजारचे बंडल बँकेत आणून जमा केली. तसेच ग्राहकही आपल्या खात्यात नोटा जमा करीत आहेत, असे सुत्रांनी सांगितले.
बँकेत येणारे ८० टक्के ग्राहक खात्यात जमा करताहेत गुलाबी नोटा
सेंट्रल बँकेच्या कॅशिअरने सांगितले की, दिवसातून एका शाखेत दोन ते अडीच लाखांच्या २ हजारच्या नोटा जमा होत आहेत. त्यातील ८० टक्के ग्राहक आपल्या खात्यातच गुलाबी नोटा जमा करीत आहेत. उर्वरित २० टक्के लोक नोटा बदलून घेत आहेत.
वीजबिल केंद्रांवर वादावादी
काही वीजबिल केंद्रांवर बिल भरताना २ हजाराच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने ग्राहक व कर्मचाऱ्यांत शाब्दिक वादावादी होत आहे. अखेर काही केंद्रांवर फलक चिटकविण्यात आले आहेत. २ हजारच्या नोटा असतील तर त्यासोबत आधारकार्ड आणि पॅनकॉर्डची झेरॉक्स सोबत आणावी व नोटाचे सीरियल नंबर लिहून द्यावे.