२०२ कोटींचा घोटाळा, १२०० वर तक्रारी; ‘आदर्श’ पतसंस्थेचा संचालक पुन्हा पोलिस कोठडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 11:53 AM2023-07-29T11:53:59+5:302023-07-29T11:53:59+5:30
११ जुलै रोजी हा घोटाळा उघडकीस आल्यापासून पाच संचालकांना अटक केली.
छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत २०२ कोटी रुपयांचा घोटाळा करून सामान्यांची फसवणूक करणारा संचालक अंबादास मानकापे याची तीन दिवसांच्या हर्सूल कारागृहाच्या मुक्कामानंतर पुन्हा पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. त्याच्यासह तपास पथकाने काकासाहेब काकडे, त्र्यंबक पठाडे यांनाही ताब्यात घेतले. तर प्रकृतीच्या कारणास्तव अशोक काकडे व रामसिंग जाधव यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
११ जुलै रोजी हा घोटाळा उघडकीस आल्यापासून निरीक्षक संभाजी पवार यांच्या एसआयटीने पाच संचालकांना अटक केली. मानकापेच्या ३५ संपत्ती शोधण्यात त्यांना यश आले. मात्र, इतर संचालक अद्यापही फरार असून, ते हाती लागलेले नाहीत. दरम्यान, मानकापेसह अन्य संचालकांना न्यायालयाने दोनवेळा पोलिस कोठडीची मान्यता दिली होती. २५ जुलै रोजी त्यांची हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. २०१६ ते २०१९ व २०१९ ते २०२३ अशा दोन स्वतंत्र लेखापरीक्षणांवरून उपनिबंधक विभागाने यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. एसआयटीने शुक्रवारी दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी मानकापे, काकडे व पठाडे या तिघांची पुन्हा नव्याने स्वतंत्र चौकशी करण्यासाठी न्यायालयाला पुन्हा पोलिस कोठडीची विनंती केली होती. सहायक निरीक्षक मोहसीन सय्यद यांनी न्यायालयाकडे ही विनंती केली असता, न्यायालयाने तिघांना १ ऑगस्टपर्यंत पाेलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
१२०० वर तक्रारी
जिल्हाभरात ४० शाखा असलेल्या पतसंस्थेत हजारो नागरिकांनी गुंतवणूक केली होती. मानकापेविरोधात तक्रार करण्यासाठी सिडको पोलिस ठाण्यात राेज गर्दी होत असून, शुक्रवारपर्यंत १२२४ तक्रारी दाखल झाल्याचे पवार यांनी सांगितले.