‘आदर्श’ पतसंस्थेतील २०२ कोटींचा घोटाळा, ठेवीदारांना पैसे परत मिळण्यास लागेल वर्ष
By प्रशांत तेलवाडकर | Published: July 20, 2023 12:32 PM2023-07-20T12:32:43+5:302023-07-20T12:33:52+5:30
प्रशासकाने कारभार सांभाळल्यावर सुरू होणार कार्यवाही
छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी पतसंस्थेत २०२ कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सर्व ठेवीदारांची झोप उडाली आहे. आपल्या मेहनतीचे लाखो रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पतसंस्थेचे सर्व सूत्र प्रशासक हाती घेणार असून त्यानंतर कर्ज वसुली, संपत्ती जप्तीच्या कारवाईला वेग येईल. मात्र, ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागू शकतो, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
२०१४ नंतर कायदा बदलला आणि पतसंस्थेला खाजगी ऑडिटरकडून ऑडिट करण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर आदर्श नागरी पतसंस्थेत दरवर्षी खाजगी ऑडिटरकडून ऑडिट केले जात होते. कर्ज वाटपातील घोळ, व्यवहारातील अनियमितता याबद्दल ऑडिटरने सहकार उपनिबंधक कार्यालयास कळविणे अपेक्षित होते; पण त्याचा थांगपत्ताही या सरकारी कार्यालयाला लागू दिला नाही. संशय आल्याने अखेर जिल्हा उपनिबंधकांनी पतसंस्थेचे २०१६ पासूनचे ‘टेस्ट ऑडिट’ करण्याचे आदेश दिले. या ऑडिटच्या अहवालातून २०२ कोटींचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली.
२०१६ पासून खाजगी ऑडिटरने पतसंस्थेतील अवाजवी कर्ज देण्याची व कामातील अनियमिततेची माहिती उपनिबंधक कार्यालयाला दिली नाही. दडवून ठेवल्याने खाजगी ऑडिटरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पतसंस्थेचे सूत्र प्रशासक हाती घेतील. त्यानंतर कर्जवसुली सुरू होईल. त्यानंतर पतसंस्थेची मालमत्ता सील करण्यात येईल, अध्यक्ष व संचालकांची मालमत्ताही जप्त करण्यात येईल. सरकारच्या आदेशानंतर या संपत्तीचा लिलाव होईल व त्यातून मिळालेली रक्कम ठेवीदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, यासाठी वर्ष लागू शकते. कर्जदार व बँकेच्या संचालक मंडळाची संपत्तीची माहिती असल्यास ठेवीदारांनी ती पोलिस किंवा सहकार उपनिबंधक कार्यालयात द्यावी. ठेवीदारांना पैसे मिळण्यासाठी विविध पातळीवर लढाई लढावी लागेल, असे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
संयम बाळगा, टोकाची भूमिका घेऊ नका
जिल्हा उपनिबंधक विभागही कायदेशीररीत्या एकेक पाऊल पुढे टाकत आहे. ठेवीदारांनी संयम ठेवावा. टोकाची भूमिका घेऊ नये.
- डॉ. मुकेश बारहाते, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)
जिल्ह्यात ७०३ पतसंस्था कार्यरत
जिल्हा उपनिबंधकांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ७०३ पतसंस्था कार्यरत आहेत. अनेक पतसंस्थांचे कार्य व्यवस्थित सुरू आहे. आदर्श नागरी पतसंस्था वगळता सध्या अन्य कोणत्याही पतसंस्थेच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत.