साठवण तलावात २१ टक्के पाणीसाठा
By Admin | Published: June 28, 2014 11:47 PM2014-06-28T23:47:45+5:302014-06-29T00:59:59+5:30
एम़जी़मोमीन , जळकोट तालुक्यातील १२ साठवण तलावांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे़ सध्या तलावात केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाणीटंचाई निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे़
एम़जी़मोमीन , जळकोट
तालुक्यातील १२ साठवण तलावांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे़ सध्या तलावात केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाणीटंचाई निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे़ शिवाय, साठवण तलावावर शेतकऱ्यांनी बसविलेले मोटारीतून उपसा वाढल्याने दिवसेंदिवस पाण्यात मोठी घट होत आहे़
जळकोट तालुक्यातील निरगा, डोंगरगाव, सोनवळा, माळ हिप्परगा, हळद वाढवणा, चेरा (२), केकतसिंदगी, हावरगा, जंगमवाडी, घोणसी, गुप्ती (२), रावणकोळा आदी १२ साठवण तलावात तालुक्यात गेल्यावर्षी पाऊस जास्त असल्याने १०० टक्के तलाव तुडूंब भरले होते़ या तलावातील पाण्यावर १५ ते २० गावांना पाणीपुरवठा केला जात आहे़ तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे़ ऊसाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी उपसा वाढविला आहे़ भर उन्हाळ्यात या साठवण तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाला आहे़ त्यामुळे तुंडुब असलेले साठवण तलाव अल्पावधीत तळाला गेले आहेत़ सध्या तालुक्यातील शंभर टक्के भरलेल्या साठवण तलावामध्ये केवळ २१ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे पाणीपुरवठा उपविभाग वाढवण्याचे उपअभियंता व्ही़बी़सुळे यांनी सांगितले़
दरवर्षी जळकोट तालुक्यात जून च्या पहिल्या आठवड्यात मृगाचा पाऊस पडतो़ त्यामुळे कोरडे पडलेल्या तलावात पुन्हा पाणीसाठा वाढत राहतो़; परंतु सध्या जून महिना संपत आला तरी तालुक्यावर पावसाचा एकही शितोडा पडला नाही़ त्यामुळे दिवसेंदिवस तलावातील पाणीसाठा कमी होत चालत असल्याचे दिसून येत आहे़
तालुक्यातील साठवण तलावावर मोठ्या प्रमाणात पाण्याच्या मोटारी चालू असून आगामी काळात पाऊसाचे प्रमाण कमी झाल्यास भविष्यात तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ प्रशासनाने याची दखल घेवून तलावावरील मोटारी बंद कराव्यात अशी मागणी दत्ता घोणसीकर, रामेश्वर पाटील, रमेश पाटील, बालाजी तिडके यांच्यासह नागरिकांतून होत आहे़
प्रशासनाचे दुर्लक्ष़़़़
तालुक्यातील १२ साठवण तलावात केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ या तलावातून सध्या मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे़ दिवसेंदिवस पाणीपातळीत मोठी घट होत आहे़ शेतकऱ्यांनी मोटारी लावून पाणी उपसा वाढविला असल्याने तलावांनी तळ गाठला आहे़ विशेष म्हणजे २० गावांना याच तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो़ पावसाने हुलकावणी दिल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे़ ढोरसांगवी तलावावरून जळकोट, कुणकी गावांना पाणीपुरवठा केला जातो़ या प्रकल्पातून पाणी संपल्यास दोन्ही गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार, अशी परिस्थिती असतानाही प्रशासनाने पाणी उपसा करणाऱ्या मोटारींकडे दुर्लक्ष केले आहे़