जिल्हा बँक निवडणुकीसाठी २१४ उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:10 PM2021-02-23T16:10:25+5:302021-02-23T16:12:26+5:30
२४ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता विधीग्राह्य उमेदवारी अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी १७२ अर्ज इच्छुक उमेदवारांनी दाखल झाले. एकूण २१४ अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवार, शनिवार, रविवार असे तीन दिवस सुट्टीचे गेल्यानंतर सोमवारी (दि.२२) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा बँकेला यात्रेचे स्वरूप आले होते. सकाळपासूनच इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक बँकेच्या दिशेने येत राहिले. दुपारी तीन वाजता अर्ज भरण्याची वेळ संपली. तरीही उमेदवारांचे अर्ज दाखल करणे सुरूच होते.
खा. डॉ. भागवत कराड, शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, आ. रमेश बोरनारे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा देवयाणी डोणगावकर, कृष्णा पाटील डोणगावकर, रंगनाथ काळे, दिलीप बनकर-पाटील, संतोष जाधव पाटील, जगन्नाथ काळे यांच्यासह जिल्हाभरातून त्याच्या मतदारसंघांसाठी मोठ्या संख्येने अर्ज भरले गेले. दुपारी ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे बँकेत आले व त्यांनी आपला अर्ज पुन्हा एकदा दाखल केला. यावेळी नितीन पाटील त्यांच्यासोबत होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी व नंतरही अध्यक्षांच्या चेंबरमध्ये बराच वेळ बसून होते. त्याआधीच हरिभाऊ बागडे बँकेत येऊन गेले होते. दुपारी अचानक खासदार डॉ. भागवत कराड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
दुपारीच महाविकास आघाडी अंतर्गत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, माजी आ. सुभाष झांबड, शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील हे बँकेत आलेले होते. दुपारी अब्दुल सत्तार आले तेव्हा बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ डॉ. काळे, सुभाष झांबड नेतेमंडळी गप्पागोष्टी करीत उभी होती. मात्र, सत्तार हे त्यांच्याजवळ जराही न थांबता लगबगीने बँकेत गेले. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची छाननी होईल. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता विधीग्राह्य उमेदवारी अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. २४ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येईल. २१ मार्च रोजी सकाळी आठ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. २२ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता मतमोजणी करण्यात येईल व निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती निर्वाचन अधिकारी मुकेश बारहाते यांनी दिली.