गेल्या वर्षी २१५ कोटीचे कर्जवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:05 AM2021-06-10T04:05:32+5:302021-06-10T04:05:32+5:30
कन्नड : शेतकऱ्यांना बँका कर्ज देत नाही अशी कायम ओरड असते. परंतु, कन्नड तालुक्यातील गेल्या खरीप हंगामात उद्दिष्टापेक्षा अधिक ...
कन्नड : शेतकऱ्यांना बँका कर्ज देत नाही अशी कायम ओरड असते. परंतु, कन्नड तालुक्यातील गेल्या खरीप हंगामात उद्दिष्टापेक्षा अधिक कर्ज वाटप करण्यात आले होते. खरीप पीक कर्जवाटप आढावा व त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनेसाठी उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच तहसील कार्यालयात राष्ट्रीयीकृत बँक व जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यात संबंधित माहिती पुढे आली आहे.
या बैठकीत २०२०-२१ साठी पीक कर्ज वाटपाचे १६६.६७ कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या तुलनेत तालुक्यातील शेतकऱ्यांना तब्बल उद्दिष्टांपेक्षा अधिक म्हणजेच एकूण २१५ कोटीचे कर्ज देण्यात आले आहे. या वर्षी २०२१-२२ या वर्षासाठी खरीप व रब्बी मिळून २१६.६७ कोटी इतके उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. संबंधित उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने बँकांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. किसान क्रेडिट कार्ड, कर्ज मागणी अर्ज खरीप व रब्बी हंगामासाठी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांच्या आधारे लाभ घ्यावा, तसेच बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याच्या सूचना विधाते यांनी दिल्या. बैठकीस तहसीलदार संजय वारकड, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक कारेगावकर, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, सहायक निबंधक अर्चना वाढेकर, ढगे यांच्यासह राष्ट्रीयीकृत, ग्रामीण तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.